रोहिदास मुंडे यांची तीव्र नाराजी
दिवा / आरती परब : दिवा परिसरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती उदयास येत असताना, प्रशासनाने डोळेझाक केल्यामुळे आज लाखो नागरिक अंधारात जीवन जगण्यास मजबूर झाले आहेत. ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी अनधिकृत घरांना वीज व पाणी जोडणी न देण्याचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.मुंडे म्हणाले, "पाणी आणि वीज या सेवा भारतीय संविधानातील अनुच्छेद २१ नुसार ‘जीवनाच्या अधिकाराचा’ भाग आहेत. आयुक्तांचा हा निर्णय अमानवी आणि अन्यायकारक आहे. तसेच जर एखादे बांधकाम अनधिकृत असेल, तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. पण त्या घरात राहणाऱ्या निरपराध नागरिकांना मूलभूत सेवा नाकारणे म्हणजे त्यांच्या जगण्याच्या हक्कावर गदा आणणे."
दिवा परिसरात लाखो घरे उभी राहताना महापालिकेचे व प्रशासनाचे अधिकारी कुठे होते, असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला. "जर ही घरे अनधिकृत होती, तर तेव्हा पालिकेकडून कारवाई का झाली नाही? आज नागरिकांनी आपले आयुष्य उभे केल्यानंतर त्यांना अंधारात ढकलणे ही लाजिरवाणी बाब आहे", असे ते म्हणाले.
ठाम मागण्या आणि आंदोलनाचा इशारा
मुंडे यांनी ठाणे महापालिकेकडे स्पष्ट मागणी केली आहे की, दिवा परिसरातील सर्व घरांना त्वरित वीज व पाणी जोडणी द्यावी. तसेच या अन्यायकारक आदेशाचे समर्थन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि अनधिकृत बांधकामांना चालना देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.
त्यांनी यासोबतच दिवा क्षेत्रासाठी विशेष नागरी सुधारणा प्रकल्प हाती घेण्याची मागणी केली आहे. "जर प्रशासनाने नागरिकविरोधी निर्णय मागे घेतला नाही, तर आम्ही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरणार आहोत. जनतेच्या मुलभूत हक्कांसाठी आम्ही लढू आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नाही!" असा ठाम इशारा मुंडे यांनी दिला आहे.
Tags
मुख्य बातम्या

