दिवा “जंक्शन” केवळ नावापुरते!

  


रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल


दिवा \ आरती परब : दिवा हे मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असून “जंक्शन” दर्जासह असले तरी त्या दर्जास अनुरूप सुविधा मिळालेल्या नाहीत, हे दुर्दैवी चित्र अजूनही कायम आहे. तर रेल्वे प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

जंक्शन असलेल्या स्थानकांवर एक्स्प्रेस‑ मेल तसेच सर्व फास्ट लोकल गाड्यांना थांबा अपेक्षित असतो; मात्र दिवा जंक्शनवर एकही एक्स्प्रेस / मेल गाडीला थांबा नाही. प्रवाशांसाठी ही गंभीर व अन्यायकारक बाब आहे. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठीही दिवा थांबा दिला जात नाही. ठाणे‑ कल्याण वरील वाढती गर्दी लक्षात घेता, दिवा हा सक्षम पर्याय असू शकतो, पण प्रशासनाचे दुर्लक्ष सुरूच आहे.


याशिवाय, दिवा पूर्वेकडील स्वयंचलित जिना (एक्सलेटर) वारंवार बंद राहत असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. दिवा ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यान थेट लोकल सेवा सुरू करावी, ही मागणी दिवेकरांनी वर्षानुवर्षे केली आहे. सध्या प्रवाशांना ठाणे किंवा डोंबिवली येथे गाडी बदलावी लागते, ज्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात. दिवा‑ CSMT थेट गाडी सुरू झाल्यास प्रवाशांचा प्रवास कमी होईल आणि ठाणे‑ कल्याणमधील गर्दीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळेल.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख यांनी प्रवाशांच्या वतीने प्रमुख मागण्या  केल्या आहेत यावर रेल्वे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे.

* दिवा जंक्शनवर सर्व फास्ट लोकल व निवडक एक्सप्रेस/ मेल गाड्यांना थांबा.

* दिवा- CSMT थेट लोकल सेवा त्वरित सुरू करावी.

* गणेशोत्सव व सुट्ट्यांच्या काळात कोकण मार्गावरील विशेष गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा मिळावा.

* दिवा पूर्वेकडील सरकता जीना कायमस्वरूपी कार्यरत ठेवून वेळेवर दुरुस्ती‑ देखरेख करावी

* “जंक्शन” दर्जास फक्त नावापुरता न ठेवता प्रत्यक्ष सुविधांमध्येही दिसू द्यावा.


वरील मागण्यांकडे त्वरित सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर दिवा परिसरातील नागरिक लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील. या संदर्भात कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सविस्तर निवेदन मेल व एक्सद्वारे सादर केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post