दिव्यात परप्रांतीयाकडून तरुणाची हत्या

   


दुसरा गंभीर जखमी; मनसे आक्रमक 

दिवा \  आरती परब : दिवा पूर्वेतील गणेश नगर येथील गणेश पाडा या भागात काल रात्री ९.३० सुमारास एका परप्रांतीय तरुणाकडून धारदार सुऱ्याने हल्ला करून स्थानिक युवकाची हत्या तर दुसऱ्या गंभीर जखमी करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे दिवा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यामुळे दिव्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.


मनसे नेते राजू पाटील (माजी आमदार) यांच्या सूचनेनुसार, तसेच दिवा शहर अध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आता मुंब्रा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दिवा पोलिस चौकीत पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली.


या भेटीदरम्यान दिवा शहरातील वाढती गुन्हेगारी, शाळा– महाविद्यालयांच्या आसपास मुलींची छेडछाड करणारे टवाळखोर, रात्री उशिरापर्यंत सुरू असणारी अमली पदार्थांची विक्री, गर्दुल्यांचा वाढता वावर तसेच बेकायदा बांगलादेशी व रोहिंग्या फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली.


तसेच, दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या अल्पवयीन आरोपीवर ही कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. या मागण्यांवर ८ दिवसांत कारवाई न झाल्यास दिवा शहरात बंद पुकारण्याचा इशारा मनसे तर्फे देण्यात आला आहे.


घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण असून पोलिस प्रशासनाने अतिरिक्त बंदोबस्त ठेवला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post