शिवसेना (शिंदे गट) कडून पुलाचे उद्घाटन ; आमदार राजेश मोरे यांची घणाघाती टीका!
डोंबिवली \ शंकर जाधव: निळजे-काटई-पलावा भागातील दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या पुलाचे उद्घाटन आज शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वतीने औपचारिकपणे पार पडले. या उद्घाटन सोहळ्याला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार राजेश मोरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. "आम्ही फक्त ट्विट करत नाही, आम्ही काम करून दाखवतो," असा घणाघात करत त्यांनी इशाराच दिला की विरोधकांनी केवळ घोषणांची आणि आंदोलनांची भूमिका घेतली, पण प्रत्यक्ष कृती शून्य राहिली.
तसेच, "गेल्या दहा वर्षांपासून काहीच काम न करणाऱ्यांनी आता बोलायचं टाळावं. शिवसेना जी बोलते ती काम करून दाखवते, हे या पुलाच्या उद्घाटनातून सिद्ध झालं आहे," असे सांगत जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे व आमदार मोरे यांनी संयुक्तपणे आक्रमक भूमिका घेतली.
या पुलाबाबत महत्त्वाचे म्हणजे, केवळ गेल्या महिन्यात याच पुलाच्या रखडलेल्या कामाविरोधात मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर पुलाचे काम गतीने सुरू झाले आणि आज अखेर त्याचे उद्घाटन पार पडले.
राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर या पुलाच्या उद्घाटनासह शिवसेना (शिंदे गट)ने पुन्हा एकदा आपली उपस्थिती ठळकपणे दाखवून दिली आहे.
Tags : #NILJE #DOMBIVLI #RAJESHMORE #SHIVSENA #PALAVABRIDGE #BREAKINGNEWS