मुंबई विद्यापीठाचा मातृभाषा शिकविण्याचा आधुनिक प्रयोग

Maharashtra WebNews
0



मुंबई: मुंबई विद्यापीठाने मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ऑनलाईन पद्धतीने मराठी शिकविण्याचा अभिनव उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. ‘मराठी ऑनलाईन’ या नावाने लवकरच एक स्वतंत्र डिजिटल व्यासपीठ आणि मोबाइल अ‍ॅप कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यामार्फत जगभरातील मराठीप्रेमींना भाषा शिकण्याची मोफत संधी मिळणार आहे.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात बाराखडीपासून व्याकरण, संवाद कौशल्य, साहित्यिक समज, लेखनकला, भाषांतर तंत्र यांसारख्या अनेक घटकांचा समावेश असून, मुलभूत ते प्रगत पातळीपर्यंतचे अभ्यासक्रम एकाच ठिकाणी मिळतील. अभ्यासक्रम व्हिडीओ व्याख्यान, ई-पुस्तके, सराव प्रश्नमंजुषा आणि ऑनलाइन चाचण्यांच्या माध्यमातून रचले गेले आहेत. अभ्यास पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ मान्यताप्राप्त प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, “मराठी ही राज्याची आत्मा आहे. ती केवळ बोलण्यापुरती मर्यादित न राहता नव्या पिढीला समजली, अनुभवली आणि आत्मसात झाली पाहिजे. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही हे उद्दिष्ट पूर्ण करू इच्छितो.”

या उपक्रमातून देशांतर्गत आणि परदेशात राहणाऱ्या मराठी भाषिक, तसेच इतर भाषिक लोकांसाठीही मराठी शिकणे सुलभ होणार आहे. विशेषतः अमेरिकेसह कॅनडा, युरोप आणि ऑस्ट्रेलिया येथील मराठी मंडळांनी या घोषणेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आपल्या मुलांना मातृभाषा शिकवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी SSC आणि HSC च्या मराठी अभ्यासक्रमाचे वर्ग, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त मराठी विभाग आणि मराठी पत्रकारिता, लेखनकला यांसारख्या पूरक कार्यशाळांचाही समावेश या उपक्रमात करण्यात येणार आहे. यामुळे मातृभाषा शिकविण्यासोबतच मराठी रोजगारक्षम भाषा म्हणून पुढे येण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमासाठी स्वतंत्र संकेतस्थळ आणि मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात येत असून, ‘MU Marathi Learn’ नावाने अ‍ॅप लवकरच Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. दरम्यान, प्राथमिक नोंदणीसाठी इच्छुकांनी marathi@mu.ac.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

मुंबई विद्यापीठाचा हा उपक्रम डिजिटल शिक्षण आणि मातृभाषेचा संगम साधत असून, मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जागतिक प्रसारासाठी एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे.

Tags : #MarathiOnline #MUInitiative #LearnMarathi #DigitalMarathi #MumbaiUniversity #LanguageLearning #GlobalMarathi #मराठी_शिका #मुंबई_विद्यापीठ

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)