खोटेनगर–पाळधी रस्त्यासाठी ३० कोटी मंजूर
बायपास पूर्ण होताच कामाला गती – पालकमंत्री पाटील
जळगाव : पाळधी ते तरसोद दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील १७.७० किलोमीटर लांबीच्या शहरबाह्य (बायपास) रस्त्याची पाहणी सोमवारी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाहणी केली.
पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले की, खोटेनगर ते पाळधी या रस्त्यासाठी ३० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, बायपास पूर्ण होताच या रस्त्याचे काम सुरू केले जाईल. या बायपास रस्त्याच्या माध्यमातून शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहनांची वाहतूक शहराबाहेर वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहतूक सुरळीत होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या रस्त्याच्या कामास वेगाने चालना देण्यात आली असून, पुढील दोन महिन्यांत संपूर्ण बायपास मार्ग वाहतुकीस खुला होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. रस्त्याच्या कामात रेल्वे ओव्हरब्रिज, लघुपुल, तसेच गिरणा नदीवरील मोठा पूल यांचा समावेश असून, कामाच्या दर्जावर आणि गतीवर प्रशासन विशेष लक्ष देत आहे.
कामाची सद्यस्थिती (NHAI च्या माहितीनुसार):
- २५ पैकी २४ कल्वर्ट्स पूर्ण
- १० पैकी ९ लघुपूल पूर्ण
- ४ अंडरपास पूर्ण
- मोठा पूल अंतिम टप्प्यात
- २ पैकी १ रेल्वे ओव्हरब्रिजचे काम सुरू
- दुसऱ्या ओव्हरब्रिजचे काम लवकरच सुरू होणार
Tags : #जळगाव #बायपासरस्ता #गुलाबरावपाटील #जिल्हाधिकारी आयुष प्रसाद #NHAI #वाहतूकसुधारणा