जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली पाहणी
प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कन्नड घाटात काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे किरकोळ दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी रस्त्याच्या बाजूने साचलेला माती-दगडांचा ढिगारा पाहून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली व उपाययोजनांचा आढावा घेतला.
या दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून घाट000 परिसरात तात्काळ साफसफाईचे काम हाती घेण्यात आले असून वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे. मात्र, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात आणखी दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन NHAI मार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अधिकाऱ्यांना निर्देश देताना सांगितले, "पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन संवेदनशील ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने जाळ्या बसवणे, पाण्याचा निचरा करण्यासाठी नाले स्वच्छ करणे आणि नियमित पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे."
प्रवाशांसाठी सूचना
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पुढील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे:
- घाट रस्त्यावरून प्रवास करताना काळजी घ्या.
- पावसात व धुके असताना वाहनांची वेगमर्यादा पाळा.
- दरड कोसळलेली, किंवा भिजलेल्या कडेकपारीजवळ उभे राहणे टाळा.
- आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी (1077) संपर्क साधा.
पावसाचा इशारा कायम
हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यासह घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत.