राज्यातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणार

Maharashtra WebNews
0


मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई :  राज्यभरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती लक्षात घेता, राज्य सरकारने तत्काळ उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

राज्यभरात विशेषतः शहरी आणि निमशहरी भागांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे लहान मुलांचे आणि नागरिकांचे जीवित धोक्यात आले असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याबाबत सदस्यांनी चिंता व्यक्त करत प्रश्न उपस्थित केला.

मंत्री उदय सामंत म्हणाले, “राज्यात सर्व महापालिका, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींना आदेश देण्यात आले असून, लवकरच राज्यव्यापी जनजागृती मोहीम, स्पे-न्यूटर शस्त्रक्रिया, लसीकरण मोहिमा आणि कुत्र्यांच्या आश्रयगृहांची उभारणी करण्यात येणार आहे.”

त्यांनी स्पष्ट केले की, “कुत्र्यांचा बंदोबस्त करताना प्राण्यांचे हक्क आणि कल्याण यांचा सन्मान राखण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई करण्यात येईल. मात्र, नागरिकांची सुरक्षा हे सरकारचे पहिले कर्तव्य आहे.”

विरोधी पक्षातील आमदारांनी काही भागांतील परिस्थिती अत्यंत भीषण झाल्याचे सांगत राज्य सरकारकडून वेळेवर आणि प्रभावी उपाय न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. काही भागांत शाळा सुरू असतानाही पालक भीतीमुळे मुलांना पाठवत नाहीत, असेही नमूद करण्यात आले.

दरम्यान, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग आणि नागरी प्रशासन विभाग यांच्यातील समन्वयाने पुढील दोन महिन्यांत एक एकात्मिक कृती आराखडा तयार करून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली जाणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)