भाजीपाला उत्पादन - केवळ अन्न नव्हे, तर आर्थिक क्रांतीचे साधन!

Maharashtra WebNews
0


आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत भाजीपाला केवळ आरोग्यदायी अन्न नसून आर्थिक समृद्धीचेही साधन ठरू शकतो. आपल्या जळगाव जिल्ह्याची सुपीक जमीन आणि अनुकूल हवामान हे भाजीपाला लागवडीसाठी अत्यंत योग्य आहे. शहरीकरण आणि आरोग्य जागृतीमुळे भाजीपाल्याची मागणी वाढत आहे. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रीय व्यवस्थापन यांचा वापर केल्यास भाजीपाला उत्पादन शेतकऱ्यांना अधिकाधिक नफा मिळवून देऊ शकते.


भाजीपाला उत्पादनात यशस्वी होण्यासाठी केवळ लागवड पुरेशी नसते. सुरुवातीपासून प्रत्येक टप्प्यावर शास्त्रीय दृष्टिकोन आवश्यक आहे. जमिनीची निवड करताना ती सुपीक, भुसभुशीत आणि निचऱ्याची सोय असलेली असावी. सूर्यप्रकाश, पाण्याची उपलब्धता आणि बाजारपेठेचा सुलभ संपर्क हे घटकदेखील लक्षात घ्यावेत. माती परीक्षण करणे फार महत्त्वाचे आहे. त्यातून जमिनीचा पीएच, पोषक तत्वांची पातळी आणि सुधारणा गरज यांचे अचूक मूल्यांकन करता येते. माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करणे खर्चही कमी करते आणि पिकाला आवश्यक पोषण पुरवते. शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत यांचा वापर केल्यास जमिनीचा पोत सुधारतो. जर जमीन चोपण किंवा क्षारयुक्त असेल, तर जिप्समचा वापर करून क्षारांचे प्रमाण कमी करता येते आणि कॅल्शियम व गंधकसारखी अन्नद्रव्ये पुरवता येतात.


चांगल्या उत्पादनासाठी योग्य बियाण्यांची निवड करणे हे अत्यावश्यक आहे. बाजारात देशी, सुधारित आणि संकरित वाण उपलब्ध असून, संकरित वाण जास्त उत्पादन देतात आणि रोगप्रतिरोधकही असतात. बियाण्यांची बीजप्रक्रिया केल्याने जमिनीतील बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होते. ट्रायकोडर्मा, थायरम यासारखी जैविक व रासायनिक प्रक्रिया यासाठी उपयुक्त ठरते. रोपे तयार करताना उंच वाफे तयार करावेत, योग्य जलनिचरा होईल याची काळजी घ्यावी. आधुनिक काळात प्रो-ट्रेचा वापर केल्यास रोपे एकसमान वाढतात, मुळे तुटत नाहीत आणि पुनर्लागवडीनंतर लवकर रुजतात. कीड-रोगांपासून रोपांचे संरक्षण करण्यासाठी रोपवाटिकेचे नियमित निरीक्षण आवश्यक आहे.


पिकांची योग्य हंगामात निवड आणि नियोजन केल्यास उत्पादन अधिक होते. रोपांची लागवड करताना योग्य अंतर राखणे, संध्याकाळच्या वेळेस पुनर्लागवड करणे आणि आंतरपिक घेणे हे फायदेशीर ठरते. आंतरपिक पद्धतीमुळे जमीन अधिक कार्यक्षम वापरली जाते, तण नियंत्रण होते आणि अतिरिक्त उत्पन्न मिळते. भाजीपाला पिकांना नियमित पाणी आवश्यक असते. ठिबक सिंचन ही सर्वोत्तम पद्धत असून पाण्याची बचत होते, पिकाच्या मुळांजवळच पाणी दिले जाते आणि तणांची वाढ कमी होते. ठिबक नसल्यास तुषार सिंचन वापरले जाते. पाण्याचे प्रमाण पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार ठरवावे.


भाजीपाला पिकांना फक्त नत्र, स्फुरद, पालाशच नव्हे, तर सूक्ष्म अन्नद्रव्येही आवश्यक असतात. यासाठी सेंद्रिय खतासोबतच रासायनिक खतांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. फर्टीगेशनच्या माध्यमातून खते ठिबकाद्वारे मुळांपर्यंत पोहोचवले जातात. काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पानांवर फवारणी करून भरून काढता येते. कीड व रोग नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धती (IPM) वापरावी. फेरपालट, रोगप्रतिकारक वाण, स्वच्छता या प्रतिबंधक उपायांसह जैविक आणि वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर करावा. निंबोळी अर्क, मेटारायझियम, बिव्हेरिया हे नैसर्गिक घटक उपयुक्त ठरतात. रासायनिक कीटकनाशके गरजेपुरतीच आणि काळजीपूर्वक वापरावीत.


तण ही शेतीतील मोठी अडचण असून ती पिकांशी स्पर्धा करून पोषक द्रव्ये आणि पाणी शोषून घेतात. त्यामुळे नियमित खुरपणी, डवरणी करणे आवश्यक आहे. आच्छादनाच्या (Mulching) वापरामुळे तणांची वाढ थांबते, जमिनीतील आर्द्रता टिकून राहते आणि तापमान नियंत्रित राहते.


आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जागेत अधिक उत्पादन घेणे शक्य आहे. पॉलीहाऊस आणि शेडनेटमध्ये नियंत्रित वातावरणात उच्च दर्जाचे भाजीपाला उत्पादन घेता येते. काढणीनंतरची व्यवस्थापन पद्धतीसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. योग्य वेळी काढणी केल्यास भाजीपाल्याची टिकाऊपणा आणि गुणवत्ता राखली जाते. प्रतवारी, आकर्षक पॅकिंग, थंड साठवणूक आणि वाहतूक यामुळे बाजारात चांगला दर मिळतो. तसेच, भाजीपाल्यापासून प्रक्रिया करून मूल्यवर्धन करता येते. उदाहरणार्थ, टोमॅटो सॉस, मिरची पावडर, वाळवलेली भाजी यामुळे उत्पन्नात वाढ होते आणि शिल्लक माल वाया जात नाही.


उत्पादनानंतर विक्री व्यवस्थापन हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. स्थानिक मंडई, कृषी उत्पन्न बाजार समित्या, थेट ग्राहक विक्री, शेतकरी गट, उत्पादक कंपन्या, ऑनलाइन प्लॅटफॉर्म यांचा वापर केल्यास विक्रीमध्ये वाढ होते आणि मध्यस्थांवर अवलंबित्व कमी होते. भाजीपाला उत्पादनात हवामान बदल, पाण्याची कमतरता, बाजारातील अस्थिरता, मजुरांची अनुपलब्धता ही काही प्रमुख आव्हाने आहेत. यावर संरक्षित शेती, ठिबक सिंचन, प्रक्रिया उद्योग, शेतकरी गटांचे बळकटीकरण आणि यांत्रिकीकरण हे उपाय उपयुक्त ठरतात. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा.


या सर्व प्रक्रियांतून डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव (गोदावरी फाउंडेशन) शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहे. महाविद्यालयाच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभव मिळतो. ‘शेतावर विद्यापीठ’ या संकल्पनेनुसार आमचे विद्यार्थी आणि तज्ज्ञ थेट शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचतात, मार्गदर्शन करतात आणि नवीन तंत्रज्ञान समजावून सांगतात. प्रशिक्षण शिबिरे, शेती शाळा, परिसंवाद, प्रात्यक्षिके यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि ते आधुनिक शेतीकडे वळतात.


शेतकरी बांधवांनो, भाजीपाला उत्पादन हे आजच्या काळात एक अत्यंत आशादायक आणि फायदेशीर कृषी पर्याय आहे. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, शास्त्रीय व्यवस्थापन आणि कृषी शिक्षण संस्थांचे मार्गदर्शन या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास आपण निश्चितच भाजीपाला उत्पादनात यशस्वी होऊ शकतो. डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि गोदावरी फाउंडेशन आपल्या पाठीशी नेहमीच उभे आहे, आपल्या प्रत्येक कृषी प्रयत्नाला साथ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. चला, एकत्र येऊन आपल्या शेतीत हरित क्रांती घडवूया आणि समृद्धीचे नवे शिखर गाठूया. 


प्रा. करण अनिल बनसोडे

(सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग)

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव (गोदावरी फाऊंडेशन)



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)