आठ लाखांचा मुद्देमाल नष्ट
दिवा \ आरती परब : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरातील खाडी किनारी गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्टी अड्यावर दिवा पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत ८ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
दिवा पूर्वेतील आगासन भागातील गणेश नगर खाडी परिसरातील अवैध गावठी दारू बनवणे सुरु असल्याची माहिती दिवा पोलीसांना मिळाली होती. तेव्हा मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता त्यांना खाडी किनारी झाडीझुटपात गावठी हातभट्टीची दारु बनवण्याची भट्टी तेथे सापडली. यावेळी २०० ड्रम दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन (३६००० लिटर) आढळून आले. हे ड्रम आणि त्यातील साहित्य पंचनामा करून जागीच नष्ट करण्यात आले.
या कारवाईत पोलीस अधिकारी व कर्मचारी – सहाय्यक पोलीस निरिक्षक वसंत खतेले, सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल कोळेकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेंद्र तोरडमल, पोलीस उपनिरिक्षक सुभाष मोरे, पोलीस अंमलदार गोविंद मुंढे, जयेश तामोरे, महेश जाधव, वसीम तडवी आणि निळकंठ लोंढे आदींचा सहभाग होता. गणेशोत्सवाच्या काळात अवैध दारू निर्मितीवर कठोर कारवाई करून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे.