धुळे : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त आज राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून धुळ्यातील ४७ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या खेळाडूंना प्रमाणपत्र, धनादेश व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात पार पडला. यावेळी आमदार राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील, क्रीडा अधिकारी रेखा पाटील, धुळे क्रीडा महासंघाचे सचिव पंढरीनाथ बडगुजर, धुळे जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे सचिव आनंद पवार, राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव सुनील चौधरी, तसेच महाराष्ट्र नेटबॉल संघटनेचे योगेश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या की, “जिल्ह्यातील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवून धुळ्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करावे. प्रशासनाकडून यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.”
जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, केंद्र सरकारतर्फे दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर सर्व खेळाडूंनी शपथ घेतली. यावेळी स्व. खाशाबा जाधव यांच्या जीवनचरित्रावर आधारित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच १७ खेळाडूंना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन योगेश्वरी मिस्तरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीधर कोठावदे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गौरव परदेशी, योगेश देवरे, स्वप्नील बोंडे, क्रीडा मार्गदर्शक योगेश पाटील, मदन गावित, मृदा अग्रवाल, दिनेश शिरसाट व राहुल देवरे आदींनी परिश्रम घेतले.