जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव समारंभ

Maharashtra WebNews
0


ठाणे :  जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी अशोक शिनगारे यांच्या सेवापूर्ती निमित्त जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालय ठाणे येथे स्नेहपूर्ण वातावरणात गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शिनगारे व त्यांच्या पत्नी स्मिता शिनगारे यांचे स्वागत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते करण्यात आले.



यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी प्रास्ताविक सादर केले. त्यांनी शिनगारे यांच्या ठाणे जिल्ह्यातील कार्यकाळातील उल्लेखनीय नेतृत्व, प्रशासनिक कार्यक्षमता आणि प्रभावी धोरण राबविण्याच्या कार्याचा विशेष गौरव केला.

या प्रसंगी ठाणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारी विशेष चित्रफीत सादर करण्यात आली. त्यात शिनगारे यांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण योजना, उपक्रम व त्यांचा क्रियाशील सहभाग यांचे दर्शन घडविण्यात आले.




मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आपल्या मनोगतात जिल्हाधिकारी शिनगारे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांशी जिव्हाळ्याने व आपुलकीने केलेल्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. त्यांनी प्रशासनातील सहकार्य, मार्गदर्शन व प्रेरणादायी नेतृत्वाबद्दल त्यांचे आभार मानत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यानंतर मनोगत सत्रात प्रकल्प संचालिका छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, तसेच विभागप्रमुखांनी जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या कार्याची प्रशंसा केली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते शिनगारे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.




मनोगत व्यक्त करताना शिनगारे यांनी आपल्या सेवाविषयक अनुभवांवर प्रकाश टाकला. त्यांनी ठाणे जिल्ह्याशी जुळलेल्या आत्मीय नात्याचा भावनिक उल्लेख करत जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. "जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये सर्वांच्या सहकार्यामुळेच प्रशासन प्रभावीपणे राबवता आले," असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले. या समारंभाने एक कर्तव्यनिष्ठ, दूरदृष्टीसंपन्न व लोकाभिमुख प्रशासकीय अधिकारी यांच्या सेवेला सन्मानपूर्वक निरोप देण्याची संधी जिल्हा परिषदेला मिळाली.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)