एअर इंडिया व टाटा समूहाकडून 'AI-171 वेल्फेअर ट्रस्ट'ची स्थापना
उर्वरित ५२ कुटुंबांची कागदपत्रे तपासून लवकरच मदतीचे वाटप
मुंबई : १२ जून रोजी अहमदाबाद येथे घडलेल्या भीषण विमान अपघातानंतर एअर इंडिया आणि तिची पालक कंपनी टाटा समूहाने हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी महत्त्वाचे पावले उचलली आहेत. या अपघातात एकूण २६० जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात २२९ प्रवासी व कर्मचारी आणि जमिनीवरील १९ जणांचा समावेश होता.
अपघातग्रस्त बोईंग ७८७ ड्रीमलाइनर, AI१७१, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेत असताना काही सेकंदांतच नियंत्रण गमावून एका विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर कोसळले. केवळ एक प्रवासी जीवंत वाचला, त्यामुळे ही दुर्घटना भारतातील अलीकडील काळातील सर्वात भयावह अपघातांपैकी एक ठरली आहे.
एअर इंडियाने याप्रसंगी जाहीर केले की, मृत झालेल्या २२९ प्रवाशांपैकी १४७ कुटुंबीयांना प्रत्येकी १.२५ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. यामध्ये १ कोटी रुपये टाटा सन्सकडून आणि २५ लाख रुपये एअर इंडियाकडून अंतरिम स्वरूपात देण्यात आले आहेत. उर्वरित ५२ कुटुंबांची कागदपत्रे तपासून लवकरच मदतीचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे. तसेच जमिनीवर मृत्यू पावलेल्या १९ नागरिकांच्याही कुटुंबांना हीच रक्कम अदा करण्यात आली आहे.
टाटा समूहाने या दुर्घटनेतील मृतांच्या स्मरणार्थ 'AI-१७१ मेमोरियल अँड वेल्फेअर ट्रस्टची नोंदणी केली असून, या ट्रस्टद्वारे पुढील कार्ये केली जाणार आहेत:
-
बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाची पुनर्बांधणी, जे अपघातामुळे उद्ध्वस्त झाले.
-
आपत्कालीन सेवा, वैद्यकीय पथक, स्वयंसेवक व सरकारी यंत्रणांना मानसिक आधार व मदतीचे कार्यक्रम.
-
मृतांच्या कुटुंबांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी योजना.
या संदर्भात बोलताना एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन म्हणाले, “या दुर्दैवी घटनेमुळे आम्हाला प्रचंड दुःख झाले आहे. सर्व मृतात्म्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे.”
एअर इंडियाने स्पष्ट केले आहे की ही आंतरिम मदत अंतिम नुकसानभरपाईत समाविष्ट केली जाईल. ट्रस्टच्या माध्यमातून पुनर्वसन, मानसिक उपचार, आणि सामाजिक मदत योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.