"आम्ही 'अंडरडॉग' नाही!"

Maharashtra WebNews
0


ENGLAND WOMENS TEAM

 युरो  महिला फुटबॉल २०२५ अंतिम सामन्यात स्पेनविरुद्ध इंग्लंडचा बदला घेण्याचा निर्धार

बॅसेल (स्वित्झर्लंड)  :  आज रविवारी (२७ जुलै) युरो महिला फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा संघ स्पेनविरुद्ध उतरणार असून, दोन वर्षांपूर्वीच्या महिला विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याचा निर्धार इंग्लंडच्या संघाने व्यक्त केला आहे.

सरिना विगमन यांच्या नेतृत्वाखालील ‘लायनेस’ संघ हा सलग तिसऱ्यांदा एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यांनी याआधी युरो २०२२ चे विजेतेपद पटकावले होते. मात्र 2023 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनकडून पराभव पत्करावा लागला होता. स्पेनच्या महिला संघासाठी हे युरो स्पर्धेतील पहिलेच अंतिम सामन्याचे आव्हान असून 2022 मध्ये त्यांना इंग्लंडने उपांत्य फेरीत पराभूत केले होते. आता दोन्ही संघांचा हा द्वंद्व सामना पुन्हा एकदा फुटबॉल जगताचे लक्ष वेधून घेणार आहे.


कर्णधार लिआ विल्यमसनचा निर्धार

इंग्लंडच्या कर्णधार लिआ विल्यमसन हिने पत्रकार परिषदेत सांगितले, "देशासाठी या सामन्याचे महत्त्व आम्हाला पूर्णपणे ठाऊक आहे. जे काही आमच्या हातात आहे, ते आम्ही करणार आहोत." विल्यमसन २०२३ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळू शकली नव्हती. ती म्हणाली, "त्या वेळी फक्त बाहेर बसून बघणं फार वेदनादायक होतं. मी काहीच करू शकत नव्हते, ही भावना सर्वात त्रासदायक होती."



दोन स्पर्धा, एकच अंतिम भिडंत 

या सामन्यामुळे महिला फुटबॉलच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदा अशी वेळ येत आहे की एकाच दोन संघांमध्ये सलग वर्ल्ड कप आणि युरो चषकाची अंतिम लढत होत आहे. याआधी २००१ आणि २००३ मध्ये जर्मनी आणि स्वीडन यांच्यात अशाच प्रकारची सलग अंतिम लढत झाली होती.

युरो स्पर्धेत इंग्लंड आणि स्पेन यांच्यात आजवर तीन सामने झालेत. २०१७ आणि २०२२  मध्ये इंग्लंडने विजय मिळवला आहे. तसेच २०२४ च्या महिला नेशन्स लीगमध्ये इंग्लंडने वेम्बलीवर १-० असा विजय मिळवला होता, तर बार्सिलोनात स्पेनने २-१ ने इंग्लंडचा पराभव केला होता.

प्रशिक्षिका सरिना विगमन यांचा आत्मविश्वास

"या दोन संघांमध्ये गेल्या काही वर्षांत खूप सामने झालेत. आम्ही एकमेकांकडून बरंच काही शिकलो आहोत. आता अंतिम फेरी एक नवीन संधी आहे. त्यांच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा आमचा प्रयत्न असेल," असं इंग्लंडच्या प्रशिक्षिका विगमन यांनी सांगितले.

परदेशात इतिहास घडवण्याची संधी

इंग्लंडचा महिला फुटबॉल संघ परदेशी भूमीवर मोठं स्पर्धा जिंकणारा देशातील पहिला संघ होण्याच्या मार्गावर आहे. बॅसेल (स्वित्झर्लंड) येथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी 9:30 वाजता हा ऐतिहासिक सामना खेळवला जाणार आहे.

"हे संधीचं क्षण आहे" – विल्यमसन

"हा क्षण म्हणजे संधीचा सर्वोच्च टप्पा आहे. या क्षणासाठी आम्ही झटत आलो आहोत. आम्ही त्याचं दडपण न घेता, त्याचं महत्त्व ओळखून मैदानात उतरू. आम्ही हा सामना आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी आमचं सर्वस्व देणार आहोत," असं कर्णधार विल्यमसनने ठामपणे सांगितले.


SPAIN WOMENS TEAM



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)