२७ गावातील भाल गावात मूलभूत सुविधांचा अभाव!

Maharashtra WebNews
0

 


रस्त्यांची व स्मशानभूमीची दयनीय अवस्था

डोंबिवली \ शंकर जाधव : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (केडीएमसी) १ जून २०१५ रोजी समाविष्ट झालेल्या २७ गावांपैकी भाल गाव हे आजही नागरी मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. येथील रस्त्यांची व स्मशानभूमीची अवस्था अत्यंत बिकट असून, ग्रामस्थांनी पुन्हा एकदा पालिका प्रशासनाकडे दुरुस्तीची जोरदार मागणी केली आहे. मागण्या लक्षात न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.


भाल आणि उंबर्ली या गावांनी पूर्वी केडीएमसीचा स्वीकार केला नव्हता, कारण अन्य गावांप्रमाणे येथे विकास होत नव्हता. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काही प्रमाणात विकासकार्य होत असले तरी नागरी सोयी-सुविधांसाठी निधीची कमतरता भासू लागली आणि त्यामुळे अखेर पालिकेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, समावेश होऊन तब्बल १० वर्षे उलटून गेली तरी भाल गावाचा विकास कागदोपत्रीच राहिल्याचे चित्र आहे.


प्रभाग क्रमांक ११७ मधील भाल-उंबर्ली गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. परिसरातील अनेक रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाले असताना, आयडीयल कॉलेजपासून जिल्हा परिषद शाळा आणि गावदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डे आणि चिखलच चिखल आहे. या रस्त्यांवरून विद्यार्थ्यांना रोजच्या रोज शाळेत जाणे म्हणजे एक मोठा त्रासदायक प्रवास आहे.



शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे शाखाप्रमुख व ग्रामस्थ सुखदेव गोपाळ पाटील यांनी सांगितले की, "या रस्त्यांची अवस्था गेली अनेक वर्षे तशीच आहे. पावसात तर रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून लहान मुलांना, महिलांना, वयोवृद्धांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते."


भाल गावातील स्मशानभूमी देखील वापरण्यायोग्य नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. येथे असलेल्या लोखंडी छताचे पत्रे गळके झाले आहेत, काही तुटले आहेत आणि संपूर्ण संरचना जीर्ण झाली आहे. मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी सुविधा मिळाव्यात ही प्राथमिक अपेक्षा असूनही पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.



ग्रामस्थ गणेश म्हात्रे म्हणाले, "स्मशानभूमीच्या दुरवस्थेबाबत अनेक वेळा पालिकेला पत्रे पाठवण्यात आली, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. रस्ते आणि स्मशानभूमी या दोन्ही बाबतीत केडीएमसीच्या प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे, अन्यथा ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील."


भाल गावातील नागरिकांच्या या समस्या ही प्रशासनाची अपयशाची साक्ष आहे. ग्रामस्थांनी एकमुखीपणे रस्त्यांची आणि स्मशानभूमीची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी केली आहे. याबाबत जर पालिकेने तात्काळ पावले उचलली नाहीत, तर येत्या काही दिवसांत नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)