पंढरपूरातील २१३ सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांची घरे

Maharashtra WebNews
0

 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा


मुंबई : सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून त्यामध्ये पंढरपूर शहरातील सफाई कामगारांसाठी निवासी सदनिकांच्या बांधकामाचा समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही लोकप्रतिनिधींनी सूचना दिल्यानंतर, त्या अनुषंगाने पंढरपूर शहरातील २१३ सफाई कामगारांना प्रत्येकी ६०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी ५५ कोटी ६१ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित असून, हे घरे सफाई कामगारांना लवकरात लवकर मिळावीत यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.


विधानसभा सदस्य हेमंत रासने यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली असता, त्यावर उत्तर देताना पवार बोलत होते. या प्रकल्पात एकूण १३ इमारती उभारण्यात येणार असून त्यामध्ये २१३ रहिवासी युनिट्स असतील. यातील १२ इमारती ४ मजली आणि एक इमारत ५ मजली असेल. याशिवाय रस्त्यालगत असलेल्या ७ इमारतींमध्ये एकूण २४ दुकाने देण्यात येणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पामुळे सफाई कामगारांच्या सन्मानपूर्वक पुनर्वसनाला हातभार लागणार आहे.


उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि कोणत्याही टप्प्यावर निधीअभावी काम थांबू दिले जाणार नाही. प्रलंबित घरांचा प्रश्न तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने आजच सोलापूर जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून आवश्यक त्या सूचनाही दिल्या जातील.


या योजनेमुळे पंढरपूर शहरातील सफाई कामगारांना स्वतःच्या मालकीचे, प्रशस्त आणि सुरक्षित घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.



Tags : #पंढरपूर #सफाईकामगार #घरयोजना #अजितपवार #महाराष्ट्रविधानसभा #SolapurNews #PandharpurDevelopment #MaharashtraWebNews #HousingForAll #UrbanDevelopment



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)