बदलापूर येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास मंजुरी!

Maharashtra WebNews
0


बदलापूर \ अशोक नाईक : मुरबाड मतदारसंघातील कुळगाव-बदलापूर येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) स्थापन करण्याच्या मागणीला अखेर यश मिळाले असून परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांनी या प्रस्तावास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. यामुळे बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड शहर आणि ग्रामीण भागातील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सोमवारी विधान भवनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आमदार किसन कथोरे यांनी ही मागणी पुन्हा मांडली. गेल्या पाच वर्षांपासून या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. बैठकीत परिवहन सचिव, परिवहन आयुक्त, उप प्रादेशिक अधिकारी बारकूल, कल्याण RTO आणि कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे प्रशासक मारुती गायकवाड यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.



परिवहन मंत्री सरनाईक यांनी या बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, “परिवहन विभागाने नगरपरिषदेकडून जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पाठवावा, मी त्यास मंजुरी देतो आणि आवश्यक निधीही उपलब्ध करून देईन.” तसेच, बदलापूर येथे तातडीने वाहन चालक प्रशिक्षण पथक आणि स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र सुरू करण्याचेही आदेश दिले आहेत.

या कार्यालयामुळे लायसन्स काढणे, नूतनीकरण, परमिट, वाहन नोंदणी आणि वाहन क्रमांक घेण्याची सर्व कामे आता बदलापूर येथूनच करता येणार आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांना कल्याण RTO पर्यंत जावे लागणार नाही, परिणामी त्यांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे.

आमदार किसन कथोरे यांनी सांगितले की, "मी सातत्याने बदलापूरसाठी RTO कार्यालयाची मागणी करत होतो. आज या मागणीला मंजुरी मिळाल्याने माझ्या प्रयत्नांना यश मिळाले आहे."




Tags : #RTO #BadlapurRTO #PratapSarnaik #KisanKathore #Murbad #BJP4Maharashtra #BJPNews

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)