ब्रेक फेल झालेल्या कंटेनर ट्रकने २० वाहनांना दिली धडक; १ महिला ठार, १८ जखमी
खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर शनिवारी दुपारी एक मोठा साखळी अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या कंटेनर ट्रकने १८ ते २० वाहनांना धडक दिल्याने एक महिलेला जीव गमवावा लागला असून, १८ जण जखमी झाले आहेत. हा अपघात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आदोशी बोगद्याजवळ घडला, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, कंटेनर ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रकने पुढील २० हून अधिक वाहनांना जोरदार धडक दिली, यामध्ये BMW, Mercedes यांसारख्या लक्झरी गाड्यांचाही समावेश आहे. अपघातात १९ जण गंभीर जखमी झाले असून, त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
जखमींना तातडीने नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खोपोली पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून, वैद्यकीय तपासणीत तो नशेत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या घटनेची एफआयआर नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे. हा भीषण अपघात लोणावळा-खंडाळा घाट उतरणीनंतर दत्ता फूड मॉलजवळ घडला. या दुर्घटनेमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, सुमारे ५ किमीपर्यंत वाहने रांगेत अडकून पडली होती. देशातील सर्वाधिक वर्दळीच्या एक्स्प्रेसवेपैकी एक असलेल्या या मार्गावर दररोज १.५ ते २ लाख वाहने धावतात.
या साखळी अपघातात किमान तीन वाहने पूर्णपणे चेंदामेंदा झाली, तर अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले, जखमींना बाहेर काढण्यात आले व रस्त्यावरील अडथळे हटविण्याचे काम सुरू असून वाहनांचा अडथळा हटवण्यासाठी क्रेन आणि टोईंग व्हेईकल्स तैनात करण्यात आले असून, वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहे. पोलीस व प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत होते.