भारतीय गोल्फमधील दोन संघटनांमध्ये संघर्षाची ठिणगी
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय गोल्फपटूंना फारसा यश लाभलेला नाही. त्यातच आता देशांतर्गत गोल्फ विश्वातही हालचालींना वेग आला आहे. ‘इंडियन गोल्फ प्रीमियर लीग (IGPL)’ या नव्या व्यासपीठाच्या घोषणेनंतर अधिकृत संघटना असलेल्या प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया (PGTI) ने देखील आपल्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करत स्वतःची लीग सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
PGTI चे सीईओ अमनदीप जोहल यांनी स्पष्ट केले की, "ही घोषणा IGPL ला उत्तर देण्यासाठी नाही, आम्ही गेल्या काही काळापासून या लीगबाबत विचार करत होतो." दरम्यान, IGPL लीग जानेवारी २०२६ पासून सुरू होणार असून, या सहा संघांच्या लीगमध्ये ६० खेळाडूंना सहभागी करून घेतले जाणार आहे. यात शिव कपूर, एसएसपी चौरसिया आणि गौरव घई यांसारख्या दिग्गजांची कर्णधार म्हणून निवड झाली आहे. तर गगनजित भुल्लर ‘आयकॉन’ खेळाडू म्हणून सहभागी होणार आहेत.
PGTI खेळाडूंचे ‘IGPL’कडे स्थलांतर
IGPL मध्ये सहभागी होण्यासाठी २० ते २२ PGTI प्रो खेळाडूंनी १० ते २० लाख रुपयांच्या साईनिंग रकमेच्या मोबदल्यात प्रवेश घेतल्याची माहिती आहे. यात अमन राज आणि सचिन बैसोया यांचाही समावेश आहे.
यावर प्रतिक्रिया देताना PGTI चे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी म्हटले, “माझ्यावर २० खेळाडूंची नव्हे, तर ३५० खेळाडूंची जबाबदारी आहे. मला मोठ्या चित्राचा विचार करावा लागतो. मी ईच्छितो की त्यांनी आमच्याबरोबर काम केलं असतं, पण आता जे झालं ते झालं.”
IGPL च्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
IGPL मागे असलेली 'भारत गोल्फ प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी केवळ गेल्या वर्षी स्थापन झाली असून, अजूनही तिने आयकर विवरणी सादर केलेली नाही, अशी माहिती PGTI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. “त्यांचा निधी कुठून येतो, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे आम्ही IGPL ला आमचा टूर ताब्यात द्यावा व त्यांनी त्याचे नामकरण ‘IGPL टूर’ करावे, ही अट आम्हाला मान्य नव्हती,” असे त्यांनी सांगितले.
PGTI च्या म्हणण्यानुसार, IGPL ही "नो कट" आणि तीन दिवसांच्या स्ट्रोक प्ले फॉरमॅटची लीग असून, खेळाडूंना हमखास बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. मात्र, जोहल यांनी याला विरोध करताना म्हटले, “गोल्फ हा स्पर्धात्मक खेळ आहे. खेळाडूंना मोफत पैसे दिले तर मेहनत करण्याची वृत्ती कमी होते. अशा रीतीने आपण जागतिक पातळीवरचे विजेते घडवू शकणार नाही.”
PGTI ची आंतरराष्ट्रीय संधी कायम
PGTI ही ‘DP World Tour’ आणि ‘PGA Tour’ सोबत भागीदारीत असून, प्रत्येक स्पर्धेसाठी किमान १ कोटी रुपयांचे बक्षीस आहे. ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ विजेत्यास युरोपियन टूरसाठी पूर्ण हंगामाची कार्ड दिली जाते. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्याप अपेक्षित यश लाभलेले नाही. २०१८ नंतर शुबंकर शर्मा हे शेवटचे भारतीय विजेते होते.
खेळाडूंमध्ये ‘हंगर’ कमी – शिव कपूर
दिग्गज शिव कपूर यांनी स्पष्ट सांगितले, “परदेशी परिस्थिती नक्कीच वेगळ्या असतात, पण आपल्याकडील खेळाडूंमध्ये विजयाची भूक दिसत नाही. ती अधिक वाढवायला हवी.”
सध्या देशांतर्गत गोल्फच्या भविष्यावर IGPL व PGTI यांच्यात सुरू असलेली स्पर्धा अधिक गडद होत असून, येणाऱ्या काळात कोणता व्यासपीठ टिकते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.