राज्यात एअर अ‍ॅम्बुलन्ससह अत्यावश्यक उपाययोजना राबवणार

Maharashtra WebNews
0


 रस्ता सुरक्षेसाठी व्यापक आराखडा तयार करणार 

मुंबई  : राज्यात रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय घेत व्यापक आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये रस्ता सुरक्षा निधीतून महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात येणार असून, अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी एअर अ‍ॅम्बुलन्स सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज तात्काळ मदत करणारी वाहनेही महामार्गांवर तैनात केली जाणार आहेत.


या संदर्भात महत्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक आज पार पडली, ज्यात परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी झाले होते.


बैठकीत सिटी फ्लो व इतर अ‍ॅप आधारित अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बससेवा संदर्भात प्राप्त तक्रारींचा आढावा घेण्यात आला. याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट निर्देश देत सांगितले की, "नियमबाह्य टॅक्सी व बस वाहतुकीवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी."


रस्ता अपघात आणि सुरक्षेच्या समस्यांवर अचूक उपाययोजना आखण्यासाठी एक स्वतंत्र एजन्सी नेमण्यात येणार आहे. ही एजन्सी राज्यातील अपघात प्रवण क्षेत्रांची सविस्तर माहिती संकलित करणार असून, त्या आधारे प्रशासन योग्य त्या उपाययोजना राबवणार आहे.


हा आराखडा आणि तात्काळ वैद्यकीय मदतीची सेवा राबविणे ही काळाची गरज असून, यामुळे राज्यातील अपघात मृत्युदरात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.





Tags : #PratapSarnaik #TransportMinister #RoadSafetyMaharashtra #AirAmbulanceService






Post a Comment

0Comments

Post a Comment (0)