परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा स्पष्ट इशारा
मुंबई \ “एसटी महामंडळ ही राज्य शासनाची अंगीकृत सार्वजनिक उपक्रम असलेली, सुमारे ८३ हजार कर्मचाऱ्यांची मातृसंस्था आहे. तिचे खाजगीकरण होणार नसून, यासंदर्भातील कोणत्याही अफवांवर कर्मचारी वर्गाने विश्वास ठेवू नये,” असा ठाम आणि स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
मुंबईतील परळ बस स्थानकात राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांच्या पुढाकारातून आणि कामगार नेते भाई जगताप यांच्या संकल्पनेतून एसटी कर्मचार्यांसाठी व प्रवाशांसाठी जलशीतक (पिण्याचे पाणी शुद्धीकरण व शीतकरण यंत्रणा) यंत्रणांचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मंत्री सरनाईक बोलत होते.
या कार्यक्रमास प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी, विभाग नियंत्रक अभिजीत पाटील, तसेच अनेक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, “एसटीचे कर्मचारी हे अत्यंत प्रामाणिक व मेहनती आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवास्थळी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करणे हे प्रशासनाचे नैतिक कर्तव्य आहे. याच दृष्टिकोनातून आम्ही लवकरच विश्रांतीगृहांची स्वच्छता, कर्मचाऱ्यांचे गणवेश धुणे व इस्त्री करणे, तसेच दाढी व केशकर्तनाची सुविधा देण्यासाठी खासगी स्वच्छता संस्था नेमणार आहोत.”
“कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन जर सकारात्मक वातावरण तयार झाले, तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,” असेही त्यांनी नमूद केले.