जळगाव जिल्हा पोलीस दलात आधुनिक वाहनांचा समावेश


जळगाव: जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ करण्याच्या दृष्टीने रविवारी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेसाठी अत्याधुनिक व नव्या चारचाकी वाहनांचा ताफा सेवेत दाखल करण्यात आला आहे. या उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची उपस्थिती लाभली.


नवीन वाहनांचा ताफा मुख्यतः पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच Escort Duties आणि रात्रीच्या गस्तीसाठी वापरण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे पोलीस दलाची कार्यक्षमता आणि गतिशीलता अधिक वाढणार आहे.


जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलाची ही वाहनसज्जता आणि यंत्रणात्मक ताकद राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बीट कॉन्स्टेबलकडे वैयक्तिक दुचाकी उपलब्ध असून, हे राज्यात एकमेव उदाहरण मानले जाते. प्रत्येक पोलीस ठाण्याजवळ किमान एक तरी चारचाकी वाहन आहे तर काही ठिकाणी तीनपर्यंत वाहनांची उपलब्धता आहे. शिवाय, जिल्ह्यात विविध ठिकाणी विशेष तपासणी नाके (Checkposts) उभारण्यात आले असून, त्याद्वारे सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम झाले आहे.

या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्टे म्हणजे पोलिसांची गस्त अधिक प्रभावी करणे, जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे, यंत्रणेची प्रतिसादक्षमता वाढवणे आणि कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे अंमलात आणणे. जळगाव जिल्ह्यातील हा उपक्रम ‘स्मार्ट पोलिसिंग’ चा आदर्श ठरत असून, नागरिकांमध्ये सुरक्षा आणि विश्वास वाढवणारा ठरत आहे. जिल्हा प्रशासन व पोलीस दल यांच्या संयुक्त प्रयत्नातून जळगाव जिल्हा एक दक्ष, सजग आणि सुरक्षित जिल्हा म्हणून राज्यात पुढे येत आहे.






Post a Comment

Previous Post Next Post