मँचेस्टर : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना आजपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जाणार असला तरी सामना सुरू होण्याआधीच पावसाचे सावट निर्माण झाले आहे. मालिकेत १-२ ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघासाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला या विजयानंतरच मालिकेत आपले वर्चस्व सिध्द करता येणार आहे.
मंगळवारी रात्री मँचेस्टरमध्ये पाऊस झाल्यानंतर आजही दिवसभर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Accuweather च्या माहितीनुसार, सकाळी १९ टक्के पावसाची शक्यता असून, दुपारपर्यंत ती ६५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. संध्याकाळी ती ४७ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी एकूण १.७ मिमी पावसाचा अंदाज आहे. यामुळे दिवसभरात खेळात खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरुवारचा दिवस अधिक चिंतेचा असून, त्या दिवशी पावसाची शक्यता तब्बल ८४ टक्के आहे. मात्र, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे दिवस तुलनेने कोरडे राहण्याची शक्यता आहे.
ढगाळ हवामानामुळे सीम गोलंदाजांना अतिरिक्त मदत मिळू शकते. ओल्ड ट्रॅफर्डची खेळपट्टी गेल्या काही वर्षांत संथ झाली असली तरी रात्री झालेल्या पावसामुळे खेळपट्टीवर थोडा जीव आला आहे. त्यामुळे पहिल्या काही सत्रांत जलद गोलंदाजांना फायदा होऊ शकतो.
दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाजी आघाडी देखील चर्चेचा विषय बनली आहे. नितीश रेड्डी आणि आकाश दीप या सामन्यात खेळणार नाहीत. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या अंशुल काम्बोजला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. तसेच अनुभवी शार्दुल ठाकूरलाही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया विजयानंतरच मालिकेत टिकून राहू शकणार असल्याने आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, पावसामुळे दोन्ही संघांसाठी अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
