मुंबई : राज्यात बोगस डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच राज्यातील सर्व खाजगी दवाखान्यांमध्ये QR कोड लावणे बंधनकारक करण्यात येणार असून, त्याद्वारे नागरिक डॉक्टरची वैधता त्वरित तपासू शकतील.
हा QR कोड स्कॅन केल्यावर संबंधित डॉक्टरची वैद्यकीय परिषदेतील नोंदणी, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर तपशील रुग्णांच्या मोबाईलवर दिसणार आहेत. त्यामुळे बोगस आणि अपात्र डॉक्टरांकडून उपचार घेण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवता येईल, असा विश्वास परिषदेनं व्यक्त केला आहे.
या उपक्रमाअंतर्गत राज्यभरातील डॉक्टरांना त्यांचे दवाखान्याच्या प्रवेशद्वारावर QR कोड लावणे आवश्यक राहील. यासंबंधी परिपत्रक लवकरच सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. ही योजना टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार असून सुरुवात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद या महानगरांपासून केली जाणार आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. अशोक इंगळे यांनी सांगितले की, “हा QR कोड आधारित उपक्रम रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त असून आरोग्यसेवांमध्ये पारदर्शकता निर्माण करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”
या योजनेनुसार, जर एखाद्या डॉक्टरकडे QR कोड नसेल किंवा तो स्कॅन होत नसेल, तर रुग्णांनी त्या डॉक्टरविरोधात तक्रार नोंदवू शकतात. अशा डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे बोगस डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करणे सुलभ होईल.
आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, आणि वैद्यकीय परिषदेचे निरीक्षक या योजनेची अंमलबजावणी एकत्रितपणे करतील. नियमांचे उल्लंघन केल्यास दवाखान्यावर दंडात्मक कारवाई, परवाना रद्द करणे किंवा दवाखाना बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.