भाजपाच्या रोशन भगत व सपना भगत यांचा पुढाकार
दिवा / आरती परब : दिव्यातील मुंब्रा देवी कॉलनी परिसरात आज एक स्तुत्य उपक्रम पार पडला. भारतीय जनता पार्टी दिवा-शिळ मंडळ आणि देवांशी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी आणि आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
ओम साई अपार्टमेंटजवळील भाजप कार्यालयात सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत हे शिबिर भरवण्यात आले. महिलांसाठी विशेष तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तपासणीचे काम डॉ. रंजनी सिंग यांनी पार पाडले.
या उपक्रमामागे भाजप ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य रोशन भगत आणि महिला मोर्चा अध्यक्षा सपना रोशन भगत यांचा मोलाचा पुढाकार होता. सपना भगत या दिवा परिसरातील महिलांचे प्रश्न सातत्याने मांडत असून, काही दिवसांपूर्वीच त्यांनी पोलीस बीट क्र. ४ मध्ये महिला अधिकाऱ्यांची मागणी केली होती – जेणेकरून महिलांना अधिक सुरक्षितता आणि विश्वास मिळू शकेल.
शिबिरात जनरल चेकअप, रक्त तपासणी, ब्लड शुगर चाचण्या, डोळे तपासणी तसेच आयुष्मान कार्ड नोंदणी अशा विविध मोफत सेवा देण्यात आल्या. स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सकारात्मक प्रतिसाद दिला.
हे उपक्रम सामाजिक उत्तरदायित्वाच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल ठरलं. आयोजकांनी दिलेल्या या सेवेमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत भाजप कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानले.
Post a Comment