अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
जळगाव : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयामार्फत विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी शिरसोली प्र.न., जळगाव येथील मे. चौधरी स्वीट्स अँड नमकीन या मिठाई दुकानावर धाड टाकण्यात आली.
तपासणीदरम्यान पेढा, बुंदी लाडू, म्हैसूर पाक, गोड गावा आदी मिठाईचे उत्पादन दर्जाहीन असल्याचे व अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून उर्वरित १५१ किलोग्रॅम मिठाईचा एकूण २४,१३० रुपयांचा साठा जप्त करून तो नाशवंत असल्याने नष्ट करण्यात आला.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी कि. आ. साळुंके, प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी आकाश बोहाडे, योगराज सुर्यवंशी, आकांक्षा खालकर व पद्मजा कढरे यांनी सहायक आयुक्त (अन्न) संतोष कृ. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. जिल्ह्यातील अस्वच्छ वातावरणात तयार होणाऱ्या मिठाई व इतर अन्नपदार्थांच्या विक्रीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहाय्यक आयुक्त (अन्न) संतोष कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.