पावसातही रेल्वे गाड्यांची वेळ सुधारली

 


मध्य रेल्वेचा दावा; मात्र प्रवाशांचा आक्षेप कायम

मुंबई :  मुसळधार पावसामुळे गाड्या उशिरा धावत असल्याच्या तक्रारी वाढत असतानाच मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने गाड्यांच्या वेळेत सुधारणा झाल्याचा दावा केला आहे. एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीत मेल व एक्स्प्रेस गाड्यांची पंक्चुअलिटी ५१ टक्क्यांवरून ५७ टक्क्यांवर गेल्याचे, तर उपनगरी गाड्यांची टक्केवारी ९२ वरून ९३ टक्क्यांवर गेल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.


रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, “मुंबई विभागाने वेळेत गाड्या धाववण्यात प्रगती साधली असून हे आमच्यासाठी महत्त्वाचे यश आहे. दररोज प्रचंड संख्येने गाड्या धावत असतानाही ही सुधारणा शक्य झाली आहे.” जुलै २०२५ मध्ये मेल व एक्स्प्रेस गाड्या ५६ टक्के वेळेत धावल्या. २०२४ मध्ये हा आकडा ४९ टक्के होता. उपनगरी गाड्या ९२ टक्के वेळेत धावल्या, तर गेल्या वर्षी हा आकडा ९१ टक्के होता. एकूण ५,९८३ गाड्या धावल्या, जे २०२४ च्या तुलनेत ७ टक्क्यांनी जास्त आहे. विशेष गाड्या २१३ चालवल्या गेल्या, तर २०२४ मध्ये १५७ होत्या, म्हणजे ३५ टक्क्यांची वाढ झाली. दररोज सरासरी १९३ लांब पल्ल्याच्या गाड्या धावल्या, गेल्या वर्षी हा आकडा १८५ होता.


मात्र प्रवासी रेल्वेच्या या दाव्याशी सहमत नाहीत. कल्याणचे प्रवासी महेश कांबळे यांनी सांगितले की, “लांब पल्ल्याच्या गाड्या वारंवार उशिरा येतात. त्यामुळे उपनगरी गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो.” तर डोंबिवलीचे मंगेश गायकवाड म्हणाले, “मुंबईच्या गर्दीच्या मार्गांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा उशीर झाल्यास उपनगरी वाहतुकीची कोंडी होते.” रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, “उपनगरी व लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये समतोल साधण्यासाठी पायाभूत सुविधा आणि वेळापत्रक सुधारण्यावर आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. वेळेत धावण्यात आणखी सुधारणा होईल.”


तथापि प्रवाशांचा सूर वेगळाच आहे. ते म्हणतात की, “आकडेवारीत सुधारणा दिसते; पण रोजच्या प्रवासात परिस्थिती वेगळीच असते. लांब पल्ल्याच्या व उपनगरी गाड्यांच्या संघर्षाचा फटका थेट प्रवाशांनाच बसतो.”

Post a Comment

Previous Post Next Post