कृत्रिम तलावाच्या अभावामुळे नागरिकांची गैरसोय
दिवा / आरती परब : दिवा पश्चिमेतील शेकडो गणेश भक्तांना आपल्या आराध्य दैवताच्या मूर्तींचे विसर्जन करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवा गावातील सुमारे चारशे ते पाचशे कुटुंबांच्या गणपती विसर्जनासाठी स्वच्छ आणि सोयीस्कर व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना दिवा पश्चिमच्या खाडीत दुर्गंधीयुक्त व घाण पाण्यातच मूर्ती विसर्जित करावी लागत आहे.
विसर्जन घाटावरच्या पायऱ्या व लाद्या तुटलेल्या असून, तिथे खड्डा पडलेला आहे. त्यामुळे भक्तांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, विसर्जनासाठी ठेवलेली बोटदेखील फुटलेली असल्याने त्यावरच मूर्त्या ठेवून नागरिकांना खाडीतच जाऊन विसर्जन करावे लागत आहे.
पालिकेने दिवा पश्चिमेत कृत्रिम तलावाची व्यवस्था न केल्याने नागरिकांत तीव्र नाराजी आहे. सध्या दोन्ही कृत्रिम तलाव केवळ दिवा पूर्वेला असून, पश्चिमेकडील नागरिकांना वंचित ठेवले गेले आहे. यावर मनसेचे विभाग अध्यक्ष देवेंद्र भगत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “दिवा पश्चिमेला तातडीने कृत्रिम तलावाची व्यवस्था व्हावी,” अशी मागणी केली आहे.
या परिस्थितीमुळे भाविकांमध्ये असंतोष असून, पुढील वर्षी तरी स्वच्छ आणि सुरक्षित कृत्रिम तलावाची उभारणी व्हावी, अशी सर्व नागरिकांची एकमुखी मागणी आहे.