ऐन सणासुदीच्या काळात पाणीटंचाईचे संकट
दिवा \ आरती परब : दिवा शहरातील शांती नगर विभागातील नागरिकांना पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे. हजारो कुटुंबे राहत असलेल्या या भागात वारंवार पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होत असून, ऐन सणासुदीच्या काळातही नागरिकांना पुरेशा पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या योगिता नाईक यांनी वारंवार पालिकेकडे निवेदन दिल्यानंतर काही दिवसांसाठीच तात्पुरता तोडगा निघतो. मात्र, काही दिवसांनी पुन्हा तीच समस्या डोके वर काढते. “प्रशासनाकडे प्रश्न आहे की निवडणुका जवळ आल्या की पाणी प्रश्न मुद्दाम निर्माण करून माजी नगरसेवकांच्या कार्यालयासमोर गर्दी व्हावी, हा त्यामागचा उद्देश तर नाही ना?” असा थेट सवाल योगिता नाईक यांनी उपस्थित केला आहे.
पाणी बिल वेळोवेळी भरूनही नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा मिळत नसल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “याला जबाबदार कोण?” असा प्रश्न आता थेट नागरिक विचारत आहेत. शांती नगर विभागातील पाणी प्रश्न ऐन सणासुदीला अधिक गंभीर बनला असून, प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी महिला आणि नागरिकांकडून होत आहे.