दिव्यातील ‘आपला दवाखाना’ बंद



उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा पर्याय खुला  ॲड. रोहिदास मुंडे यांचा प्रशासनाला इशारा


दिवा/ आरती परब :  दिवा शहरातील नागरिकांसाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेला ‘आपला दवाखाना’ कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद करण्यात आला आहे. या निर्णयामुळे परिसरातील सुमारे ५ लाख नागरिकांच्या आरोग्य सेवांवर गदा आली असून संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

“आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत जीवनाचा व आरोग्याचा हक्क अबाधित आहे. महानगरपालिकेवर नागरिकांना किमान आरोग्य सेवा पुरविण्याची कायदेशीर जबाबदारी आहे. मात्र, ‘फिरता दवाखाना’ बंद करून आधीच लोकांना सेवांपासून वंचित ठेवले होते. आता ‘आपला दवाखाना’ही बंद करून महापालिकेने स्वतः दिलेल्या लिखित आश्वासनाचा भंग केला आहे.”

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) कल्याण  कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी याबाबत जोरदार प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले,

मुंडे यांनी यावेळी इशारा दिला की, “नागरिकांकडून नियमित मालमत्ता कर व स्थानिक कर वसूल केला जातो. तरीदेखील आरोग्य सुविधा न पुरविणे हा सार्वजनिक निधीचा दुरुपयोग आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम 166, 269, 336 व 304(A) अंतर्गत गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तसेच, “दिव्यात स्थायी दवाखाना आणि २४x७ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होईपर्यंत ‘आपला दवाखाना’ अखंडित सुरू ठेवणे, वाढत्या लोकसंख्येनुसार आपत्कालीन सुविधा तसेच आवश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्यथा नागरिकांना आंदोलनात्मक पावले उचलावी लागतील तसेच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा पर्याय खुला राहील,” असा इशाराही मुंडे यांनी दिला.

 निवेदन देताना शहर प्रमुख सचिन पाटील, महिला शहर संघटिका ज्योती पाटील, युवासेना अधिकारी अभिषेक ठाकूर, विभाग प्रमुख रवी रसाळ, नागेश पवार, आकाश विचारे, विकी मंचेवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post