सात वर्षे उलटली तरी दिवा ब्रिज अजूनही अर्धवट!


 जनता विचारते – हा पूल होणार कधी पूर्ण?”

दिवा \ आरती परब : दिवा पूर्व- पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा ROB ब्रिज आज सात वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. या पुलाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ता रुंदीकरण करण्यात आले. तेव्हा २२ इमारती तोडल्या, अनेक नागरिक बेघर झाले, शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही, दुकांदारांना दुकाने मिळाली नाहीत. दिवाळीच्या तोंडावर लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, पण आजही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही.


रुंदीकरण झालेल्या रस्त्यांवर हातगाड्या बसवून प्रत्येकाकडून ५० रुपयांचा हप्ता वसूल केला जात आहे. नागरिकांना चालण्यासाठी मोकळे फुटपाथ नाहीत. रस्त्यांवर वाहतूक कोंडी, गर्दी आणि गोंधळ कायम आहे.


या सर्व परिस्थितीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲड. रोहिदास बामा मुंडे यांनी महापालिका व सरकारला थेट सवाल उपस्थित केले आहेत.


 “रस्ता रुंदीकरण झाले पण चालायची सोय नाही, ब्रिज अर्धवट राहिला, फुटपाथ व्यापलेले. दिवा पश्चिमच्या नागरिकांच्या समस्येत वाढ.. दिव्यातील सामान्य नागरिक विचारतोय – पुल तयार होणार कधी? रस्ते मोकळे होणार कधी? फेरीवाल्यांची दादागिरी थांबणार कधी? पार्किंग हटणार कधी?” 


शहरातील नागरिकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना त्रास दिला जातोय, ही बाब गंभीर आहे. सरकार आणि महापालिकेने तातडीने कारवाई करून पुलाचे काम पूर्ण करावे, फेरीवाल्यांची वसुली थांबवावी आणि नागरिकांना मोकळे, सुरक्षित रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी ठाम मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करत आहे.




Post a Comment

Previous Post Next Post