शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुख सचिन पाटील यांना निलेश पाटील यांचा उपरोधीक टोला
दिवा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील यांनी अलीकडेच माध्यमांशी बोलताना “दिवा शहराचा विकास फक्त कागदावर नाही, तर प्रत्यक्षात घडवून दाखवू” असे विधान केले होते. या विधानावर आता शिवसेनेचे स्थानिक नेते निलेश पाटील यांनी उपरोधिक प्रतिक्रिया देत तीव्र शब्दांत टीका केली आहे.
निलेश पाटील म्हणाले की, “सचिन पाटील यांच्या घरात नगरसेविका असताना त्यांनीच त्या काळात पद हातात घेऊन पाच वर्षे कारभार केला. तेव्हा साबे गावातील स्थानिक नागरी सोयी यांच्या समस्या सोडवता आल्या नाहीत. तेव्हा त्यांनी विकास कामे केलीच नाहीत आणि आता मात्र माध्यमांमधून लोकांना आवाहन करीत आहेत की मला पुन्हा संधी दिल्यास विकास प्रत्यक्षात घडवून दाखवू. मग मागील पाच वर्षे जनतेने तुम्हाला कशासाठी दिली होती?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच निलेश पाटील पुढे म्हणाले की, “जनता आता जागरूक आणि सुज्ञ आहे. प्रत्येकवेळी गोड भाषणांनी लोकांना फसवता येणार नाही. दिव्यातील नागरिकांना विकास हवा आहे, आश्वासनं नव्हे. या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाच्या आणि शिवसेना पक्षात पुन्हा राजकीय चुरस वाढली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

