मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये १५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त
दिवा \ आरती परब : मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाने कहर केला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली, जमिनी वाहून गेल्या, जनावरांचा मृत्यू झाला, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. निसर्गाच्या या प्रकोपामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे.
या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये १५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला. हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती देण्यात आला.
माजी आमदार भोईर यांनी सांगितले की, “शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. संकटाच्या काळात त्याच्या मदतीला धावून जाणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.” त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
