नागरिकांनी केल्या वाहतूक, पाणीटंचाईसह विविध मागण्या
दिवा \ आरती परब : दिव्यातील वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढणाऱ्या नागरी समस्यांमुळे संतप्त नागरिकांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या समोर आपल्या तक्रारी मोठ्या संख्येने मांडल्या. या समस्यांचे निवेदन भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा शहर उपाध्यक्ष विजय भोईर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी वनमंत्र्यांना सादर केले.
ठाणे जिल्ह्यातील जनतेच्या समस्या ऐकून त्यावर तत्काळ उपाययोजना व्हाव्यात यासाठी राम गणेश गडकरी रंगायतन, तलावपाळी, ठाणे येथे वनमंत्री गणेश नाईक यांच्या वतीने “जनता दरबार” आयोजित करण्यात आला होता. या दरबारात दिवा विभागातील भाजप पदाधिकाऱ्यांनी विविध स्थानिक समस्या मांडण्यात आल्या.
विशेषतः दिवा स्टेशनपासून आगासन, मुंब्रा देवी कॉलनी रोड आणि दिवा टर्निंग परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी, रस्त्यावरची अव्यवस्था आणि नागरिकांची व्यथा या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. अनेक वेळा लेखी निवेदने आणि रस्ता रोको आंदोलन करूनही दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्तांकडून “मनुष्यबळ व वाहनांची कमतरता” हीच सबब देण्यात येत असल्याची नाराजी भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
याउलट, फेरीवाल्यांना पाठीशी घालणाऱ्या वसुलीवाल्यांचे बळ वाढत असल्याबद्दल नागरिकांनी रोष व्यक्त केला. तसेच, दिवा विभागातील वाढती पाणीटंचाई आणि नागरिकांना होत असलेली तीव्र गैरसोय या समस्यांवरही नागरिकांनी लक्ष वेधले.
या सर्व तक्रारींवर वनमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
जनता दरबार प्रसंगी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय अनंत भोईर, शिवशक्ती रिक्षा युनियन अध्यक्ष विनोद भगत, भाजप महाराष्ट्र प्रदेश शिक्षण प्रकोष्ठाचे नरेश पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या दरबारानंतर दिवा परिसरातील नागरिकांमध्ये आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, अशी आशा निर्माण झाली आहे.