ठाण्यातील हिरानंदानी मिडोज परिसरात ‘राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क’ ची उभारणी
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून आणि निधीतून ठाण्यातील हिरानंदानी मिडोज परिसरात एक आगळावेगळं ‘ऑक्सिजन पार्क’ उभं राहत आहे. या हरित उपक्रमाला ‘राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क’ असं नाव देण्यात आलं असून, येत्या दिवाळीत ठाणेकरांसाठी ही एक अनोखी भेट ठरणार आहे.
बुधवारी खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह या उद्यानाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाच्या प्रगतीची सविस्तर माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचनाही दिल्या.
हे उद्यान केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर ठाणेकरांच्या आरोग्याला नवी ऊर्जा देणारे केंद्र ठरणार आहे. संपूर्ण परिसर फुलझाडे, औषधी वनस्पती आणि दाट हिरवाईने सजवला जात आहे. बांबू, तुळस, नीम, आवळा, अशोक यांसारख्या अनेक झाडांची लागवडकरण्यात आली आहे. या झाडांमुळे परिसरातील हवेची शुद्धता वाढेल आणि नागरिकांना सकाळ-संध्याकाळी शुद्ध वातावरणाचा आनंद घेता येईल.
या ठिकाणी असलेलं शंभर वर्ष जुनं झाड जतन करून ठेवण्यात आलं आहे. उद्यानात आकर्षक वॉकिंग ट्रॅक, झाडांखाली सावलीदार विश्रांतीस्थान, तसेच लहान तलाव तयार करण्यात येत आहे. या तलावात कमळ व जलवनस्पती लावून नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलवले जाणार आहे. त्याचबरोबर सुंदर आमराई सुद्धा या उद्यानाची शोभा वाढवणार आहे.
ठाणे शहरात वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचं ऑक्सिजन पार्क ही काळाची गरज होती. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या दुरदृष्टीतून आणि पर्यावरणपूरक विचारातून उभं राहत असलेलं हे उद्यान, ठाणे शहराच्या सौंदर्यात भरघालणार आहे.
येत्या दिवाळीत या ‘राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क’चं भव्य उद्घाटन होणार असून, ठाणेकरांसाठी हे एक आरोग्यदायी आणि हरित भेटवस्तू ठरणार आहे.