ठाण्यात भव्य रांगोळी प्रदर्शन

 


 कलाकारांच्या सृजनातून उजळली दीपावली

कलाछंद रंगोळीकार मंडळ ठाणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संयुक्त उपक्रम 


ठाणे :  रंगांच्या संगतीतून फुललेली परंपरा, कलाकारांच्या कल्पकतेतून उजळलेली दीपावली आणि समाज मनाला सृजनशीलतेची नवी दिशा देणारे कला दालन अशा अद्भुत वातावरणात ठाण्यात यंदाही ‘भव्य रांगोळी प्रदर्शन २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. कलाछंद रांगोळीकार मंडळ ठाणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे आकर्षक व्यक्तीचित्र रांगोळी प्रदर्शन २० ते २६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत वर्तकनगर येथील ब्राम्हण विद्यालय, येथे भरविण्यात आले आहे.




गेल्या ३२ वर्षांपासून सुरू असलेले हे प्रदर्शन ठाण्याच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग बनले आहे. प्रत्येक वर्षी रांगोळ्यांच्या माध्यमातून सामाजिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी विषयांवर कलावंत आपली अभिव्यक्ती साकारतात. यावर्षीचे प्रदर्शन ‘रंगांमधून एकता आणि संस्कृतीचे दर्शन’ या भावनेला साजेसे ठरणार आहे.



 सायंकाळी ५ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार असून, ठाणेकरांना रंग, कल्पकता आणि कलात्मकतेचा संगम अनुभवता येणार आहे. या वर्षीच्या प्रदर्शनात अनुभवी तसेच नवोदित कलाकारांच्या अप्रतिम व्यक्तीचित्र रांगोळ्या साकारल्या जाणार आहेत. सुभाष शाक्यवार यांनी प्रसिद्ध अभिनेते अमरीश पुरी, उमेश सुतार यांनी बाळासाहेब ठाकरे , राज ठाकरे व उद्धव ठाकरे, नितीन कोळी यांनी ‘नाळ’ चित्रपट, योगेश भागणे यांनी छावा, बबन राणे यांनी रोहित शर्मा व विराट कोहली, मनोज सावंत यांनी संध्या शांताराम, प्रथमेश वाघमारे यांनी दशावतार, सुधाकर भोसले यांनी जोकर, मयंक थोरात यांनी सदगुरू महाराज, मृण्मयी कोळी यांनी स्त्रीशक्ती कॅन्डल लेडी, तर हिंदवी तरे यांनी दि. बा. पाटील यांच्या व्यक्तीचित्रांची रंगोळी सादर करणार आहेत.





रांगोळी ही भारतीय परंपरेतील शुभतेचे प्रतीक मानली जाते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील हे प्रदर्शन फक्त रंगांची मेजवानी नाही, तर कलावंतांच्या कल्पकतेचे, समर्पणाचे आणि सृजनशीलतेचे दर्शन घडवणारा एक भव्य कलासोहळा आहे. ठाणेकरांसाठी दिवाळीचा हा रंगोत्सव एक अद्वितीय कलानुभव ठरणार असून, या प्रदर्शनातून कलेचा आणि संस्कृतीचा प्रकाश अधिक उजळणार आहे असे आयोजक मनसेचे संदीप पाचंगे यांनी सांगितले.




Post a Comment

Previous Post Next Post