पारोळा : प्रशासनातील मानवी बाजू अधोरेखित करणारा एक हळवा क्षण पारोळा तालुक्यातील देवगाव मुकबधीर विद्यालयात पाहायला मिळाला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी या विद्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या भावविश्वाशी एकरूप झाल्याचे दृश्य सर्वांच्या मनाला स्पर्शून गेले.
मीनल करनवाल या जिल्ह्यातील विविध विकासकामांबरोबरच सामाजिक संवेदनशीलतेच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतात. देवगाव येथील मुकबधीर विद्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी हात मिळवला, त्यांना कडेवर घेतले आणि त्यांच्या संवादाच्या अनोख्या पद्धतीशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला.
त्या मुलांशी ममतेने बोलताना, त्यांच्यासोबत हसताना व त्यांच्या जगात रममाण होताना दिसलेला त्यांचा मानवी आणि संवेदनशील दृष्टिकोन उपस्थित सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. अधिकारी नव्हे तर ममतेचा अविष्कार अशी भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली. त्यांच्या या भेटीने केवळ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले नाही, तर प्रशासनातील माणुसकीची बाजू किती जिव्हाळ्याची असू शकते याचे उदाहरण दिले.
देवगाव मुकबधीर विद्यालयातील या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शिक्षणप्रक्रियेबाबतही माहिती घेतली, शाळेच्या पायाभूत सुविधा पाहिल्या आणि पुढील काळात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मीनल करनवाल यांच्या या संवेदनशीलतेने जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आणि शिक्षकवर्गालाही प्रेरणा मिळाली असून, समाजात ‘संवेदनशील प्रशासन’ ही संकल्पना त्यांच्या कार्यातून प्रत्यक्षात उतरल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
Tags : #JilhaParishadJalgaon #MinalKaranwal #InspiringLeadership #Devgaon #Parola