दिवा \ आरती परब : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) यांच्या बालसंस्कार व युवाप्रबोधन विभागांतर्गत दिवा केंद्राच्या वतीने वसुबारस दिनानिमित्त “आपुलकीची दिवाळी” हा उपक्रम रिटघर आदिवासी पाड्यात राबविण्यात आला.
या निमित्ताने दिवा केंद्रातील सेवेकऱ्यांनी पनवेल तालुक्यातील रिटघर (आदिवासी पाडा, कातकरी वाडी) येथे भेट देऊन आदिवासी बांधवांना गुरुप्रसाद (दिवाळी फराळ) तसेच लहान मुलांना खाऊचे वाटप केले. पाड्यातील बहुसंख्य नागरिक वीटभट्टीवर मजुरी करणारे असून, त्यांच्यापर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवण्याचा प्रयत्न सेवेकऱ्यांनी केला.
गुरुप्रसाद स्वीकारताना आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर दिसणारा आपुलकीचा आणि आनंदाचा भाव हा या सेवेचा खरा समाधानकारक क्षण ठरला. दोन पाड्यांतील मिळून सुमारे ४१ कुटुंबे व २०० लोकसंख्या असलेल्या या दुर्गम भागात सेवा कार्य पोहोचवण्यात आले.
ही सेवा करण्याचे भाग्य श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने लाभले, असे सेवेकऱ्यांनी सांगितले. तसेच रिटघर गावचे पोलीस पाटील दिपक पाटील यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
“अशीच सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांनी आमच्या हातून करुन घेऊदेत, हिच आमची प्रार्थना. तसेच झालेली सेवा आम्ही सर्व सेवेकरी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करतो.” असे मत सेवेकऱ्यांनी व्यक्त केले.