पाणीप्रश्नवर भाजप पदाधिकाऱ्यांचा पालिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा;




भाजप पदाधिकारी आक्रमक तर महिलांनी वाचला समस्यांचा पाढा

दिवा \ आरती परब  : ठाणे महानगर पालिका हद्दीतील दिवा पश्चिम भागातील एन. आर. नगर, क्रिश कॉलनी, गावदेवी मंदिर, बंदर आळी, मधली आळी, म्हात्रे आळीतील महिलांनी पालिका अधिकाऱ्यांसमोर समस्यांचा पाढाच वाचला. तर कित्येक वर्षे त्या भागातील पाणी समस्येकडे दुर्लक्ष केल्याबद्दल दिवा भाजपने तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिवा प्रभाग समितीच्या पाणी आणि बांधकाम अभियंत्यांसोबत पाहणी दौरा करून तेथील भीषण पाणी टंचाईची गंभीर समस्या जाणून घेतल्या.


दिवा भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या नेतृत्वात युवा मोर्चाचे डॉ शशिकांत केळशीकर यांनी सहाय्यक आयुक्तांना सन २०२३ पासून वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने दिवा भाजपा पाणी समस्येवर आक्रमक झाली आहे. दिवा पश्चिमच्या नागरिकांना पाईपासमोर वाडगी अथवा छोटे कॅन लावून पाणी भरावे लागत आहेत. तसेच इमारतीचे चार मजले चढून पाणी भरावे लागत आहे. तर रात्रीच्या पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहे. दिवा पश्चिमेला फाटकामुळे टँकरचे पाणीही विकत मिळत नाही. या गंभीर समस्याची तातडीने दखल घेऊन दिवा पश्चिम विभागातील पाणी प्रश्न त्वरित सोडवावा अन्यथा भारतीय जनता पार्टी तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिवा भाजपने दिला आहे.


पिण्याच्या पाणीची मध्यरात्रीची वेळ, पाण्यासाठी महिलांना जाग्रण झाल्याने आजारांमध्ये वाढ, पाण्याचा फोर्स कमी, पाणी अशुध्द, गढूळ असल्याने पोटाचे आजार, किती दिवस विकतचे पाणी पिणार आम्ही सामान्य नागरिक असा विविध समस्यांचा पाढाच दिवा पश्चिमच्या महिलांनी पालिका अधिकाऱ्यांसमोर वाचला. तर दिवाळीला पाणी समस्येचे निराकरण करुन महिलांना भाऊबीज गिफ्ट द्या असे, डॉ केळशीकर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.


यावेळी उपस्थित भाजपा दिवा शीळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, भाजपा दिवा शीळ मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा सौ सपना रोशन भगत, ठाणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष शशिकांत (सतीश) मनोहर केळशीकर, भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विजय अनंत भोईर, भाजपा ठाणे जिल्हा ओबीसी मोर्चा व उपाध्यक्ष विनोद भगत, ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य रोशन प्रभाकर भगत, ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य गणेश भगत, ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य सौ. रेश्मा नरेश पवार, महाराष्ट्र प्रदेश शिक्षण मंडळ श्री नरेश पवार व सर्व दिवा भाजपा पदाधिकारी व दत्ता कोलते कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post