दिवा / आरती परब : ठाणे महानगर पालिकेतील वाढती वाहतूककोंडी, पाणीटंचाई, कचऱ्याच्या समस्या, अनियंत्रित विकास आणि सर्वव्यापी भ्रष्टाचार या गंभीर प्रश्नांवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करत आहेत.
या आंदोलनासाठी दिवा विभागातून शेकडो शिवसैनिक आणि मनसैनिक ठाण्याकडे रवाना झाले असून, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा येथील जनतेचे असंख्य प्रश्न घेऊन शिवसेना नेते व मनसे नेते माजी खासदार राजन विचारे, माजी आमदार राजू पाटील, जिल्हाप्रमुख केदार दिघे, अविनाश जाधव, अभिजीत पानसे, गुरुनाथ खोत यांच्या नेतृत्वात आज हे आंदोलन ठाणे महानगर पालिकेच्या मुख्यालयावर धडक दिली आहे. दिवा परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून पाण्याची तीव्र टंचाई, कचऱ्याचा ढिगारा, रस्त्यांची दयनीय अवस्था आणि भ्रष्ट प्रशासनाचा त्रास सहन करावा लागत आहे. जनतेच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त नागरिक आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने ठाण्यात उतरले आहेत.
या धडक आंदोलनामध्ये दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून, “जनतेच्या हक्कासाठी आणि ठाणेकरांच्या न्यायासाठी” असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. “जनतेचे प्रश्न सोडवा, नाहीतर जनता उत्तर देईल” असा इशारा आंदोलन कर्त्यांकडून ठाणे महानगर पालिकेला देण्यात आला आहे.