जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे गुरुवारी ९ ऑक्टोबर रोजी रोहन घुगे (भाप्रसे) यांनी अधिकृतपणे स्वीकारली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी पदभार स्वीकारताना प्रशासनातील पारदर्शकता, जबाबदारी आणि लोकसहभाग वाढविण्याचा संकल्प व्यक्त केला.
रोहन घुगे हे यापूर्वी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा परिषदेला डिजिटल प्रशासन, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी साधता आली. विशेषतः त्यांनी राबविलेल्या ‘कार्यालयीन मूल्यमापन १०० दिवसांचा कृती कार्यक्रम’ उपक्रमात ठाणे जिल्ह्याने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला होता.
माजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली नाशिक जिल्ह्यात झाल्यानंतर शासनाच्या आदेशान्वये रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारण्याच्या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नवीन जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर घुगे यांनी सांगितले की, “जळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, नागरिककेंद्री प्रशासन आणि शेतकरी, विद्यार्थी, महिला व युवक यांच्या प्रगतीसाठी समन्वयाने काम करणे हेच माझे प्रमुख ध्येय असेल.”
जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात त्यांच्या नियुक्तीचे स्वागत होत असून, ठाण्यातील त्यांच्या कार्यकौशल्याचा जळगावला नक्कीच फायदा होईल, अशी प्रतिक्रिया अधिकारीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.