दिव्यांगांच्या हक्कांसाठी प्रा. भरत जाधव यांचा पुढाकार


ठाणे महापालिका आयुक्तांची घेतली भेट

दिवा \ आरती परब  : दिव्यांग ह्युमन राइट्स फेडरेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. भरत जाधव यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची तातडीने भेट घेऊन दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली.


दिव्यातील दिव्यांग बांधवांकडून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाची आणि काळी दिवाळी साजरी करण्याच्या आंदोलनाची माहिती प्रा. जाधव यांनी आयुक्तांना दिली. यावेळी त्यांनी दिव्यांगांचे मासिक अनुदान नियमित मिळावे आणि त्या अनुदानात सातत्याने वाढ व्हावी, अशी ठोस मागणी केली.


आयुक्त सौरभ राव यांनी सर्व मुद्दे लक्षपूर्वक ऐकून घेत सोमवार, सकाळी ११ वाजता महापालिका मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक घेण्यास तत्काळ सहमती दर्शविली. या बैठकीत दिव्यांगांच्या विविध मागण्यांवर सखोल चर्चा होणार आहे.


प्रा. जाधव म्हणाले, “संविधान आणि दिव्यांग हक्क कायद्याप्रमाणे दिव्यांगांना न्याय मिळावा यासाठी आम्ही सातत्याने संघर्ष करत आहोत. प्रशासनाने याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे.”


त्यांनी सर्व दिव्यांग बांधवांना या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही प्रा. जाधव हे दिव्यांगांच्या हक्कांच्या लढ्यात आघाडीवर असून, त्यांनी आयुक्तांसमोर अनुदानवाढ, सरकारी-निमसरकारी सेवांमध्ये ५% राखीव नोकऱ्या, घरकुल योजना, दिव्यांग स्टॉल, आरोग्य व परिवहन सुविधा अशा अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या.


ठाणे शहरातील दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला तसेच इतर सामाजिक घटकांनी प्रा. भरत जाधव यांच्या या प्रयत्नाचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.



Post a Comment

Previous Post Next Post