दुबार मतदार याद्यांविषयी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांची आक्रमक भूमिका
रायगड : मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाबद्दल निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवत लोकशाहीचा आणि खऱ्या मतदारांचा आवाज बुलंद करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष, महाविकास आघाडी आणि मनसेच्यावतीने शनिवारी मुंबईत ‘सत्याचा महामोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव व मतदार याद्यांतील अनियमितता या मुद्द्यांवर सर्वपक्षीय नेत्यांनी एकमुखाने संताप व्यक्त केला.
यावेळी बोलताना शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले की, निवडणुकीचा पहिला पाया म्हणजे मतदार यादी असून तो पाया नष्ट करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. दबाव आणून निवडणूक आयोगाला हाताशी धरून बोगस मतदार यादी तयार केली जात आहे. दुबार नावे, चुकीची माहिती आणि वेगवेगळ्या भागांतील नावे यादीत घुसवून लोकशाहीची पायाभरणीच खिळखिळी केली जात आहे. या सर्व प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि खऱ्या मतदारांच्या हक्कांच्या रक्षणासाठी हा विराट मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, अनेक मतदारसंघांमध्ये मतदार याद्यांमध्ये दुबार नावे आहेत. काही ठिकाणी इतर भागातील मतदारांची नावे घुसवण्यात आली आहेत. काही ठिकाणी चुकीची नावे टाकण्यात आली आहेत. सदोष मतदार याद्यांवर आधारित निवडणुका घेणे हा सरकारचा एकतर्फी आणि अन्यायकारक निर्णय आहे. सत्ता आणि पैशाच्या मस्तीमुळे लोकशाहीची पायमुळे हलवली जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी “मतदार याद्या स्वच्छ करा”, “लोकशाहीचा अपमान थांबवा” अशा घोषणा देत निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात दुबार व बोगस मतदार नावे तातडीने रद्द करून नव्याने पारदर्शक यादी तयार करण्याची मागणी करण्यात आली.
या मोर्चाला महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), कॉंग्रेस तसेच मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विविध सामाजिक संघटना, महिला संघटना आणि विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला.
दुबार मतदार याद्यांविषयी निवडणूक आयोग कोणती भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आयोगाने योग्य कारवाई केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून हा अन्यायकारक प्रकार थांबवू, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला. निवडणुका स्वच्छ आणि निष्पक्ष करण्यासाठी पारदर्शक मतदार यादी हा लोकशाहीचा पाया असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
“सत्याचा महामोर्चा” या नावाने आयोजित करण्यात आलेला हा मोर्चा केवळ मतदार याद्यांपुरता मर्यादित नसून, लोकशाहीच्या सन्मानासाठी आणि जनतेच्या मताधिकाराच्या संरक्षणासाठी उभारलेला संघर्ष असल्याचे शेकाप नेत्यांनी स्पष्ट केले. दुबार मतदार याद्या तात्काळ दुरुस्त केल्या नाहीत तर संपूर्ण राज्यभर व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
