शेखर धोंगडे / कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. परीक्षेचा पेपर आधी देण्याचे आमिष दाखवत विद्यार्थ्यांकडून मूळ शैक्षणिक कागदपत्रे व रोख रक्कम स्वीकारून फसवणूक करणाऱ्या या रॅकेटवर २३ नोव्हेंबर रोजी छापा टाकण्यात आला. यामध्ये रविवारी ७ आरोपीसह १० संशयितताना ताब्यात घेण्यात आले होते. याचप्रकरणी सोमवारी मुख्य सुत्रधार महेश भगवान गायकवाड यासह एकूण १८ आरोपींना अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या पथकाने मुरगूड पोलिसांच्या मदतीने कागल तालुक्यातील सोनगे येथील शिवकृपा फर्निचर मॉलवर छापा टाकला असता घटनास्थळी सात आरोपी ताब्यात मिळाले, तर रॅकेटचा मुख्य सुत्रधार महेश गायकवाड फरार झाला होता. या प्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अटक आरोपींच्या पोलिस कस्टडी रिमांडदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार व जप्त पुराव्यांच्या आधारे पुढील तपासात या रॅकेटमध्ये सहभागी असलेले आणखी ११ जणांना कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले. यामध्ये रोहित सावंत, अभिजीत पाटील, संदीप गायकवाड, अमोल जरग, स्वप्निल पोवार, रणधीर शेवाळे, तेजस मुळीक, प्रणय सुतार, संदीप चव्हाण, श्रीकांत चव्हाण यांचा समावेश असून शेवटी फरार मुख्य सुत्रधार महेश भगवान गायकवाड यासही कराड येथे पकडण्यात आले. अशा प्रकारे एकूण १८ आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व आरोपींची पोलीस कस्टडी २५ नोव्हेंबरपर्यंत मंजूर करण्यात आली आहे. तपास सुरू असून आरोपी संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, प.उ.नि. जालिंदर जाधव, संतोष गळवे, मुरगूड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. शिवाजी करे, श्रेणी उ.नि. अनिल जाधव आणि अमलदार युवराज पाटील, राजेश राठोड, विनोद चौगुले, प्रदीप पाटील, राजू कोरे, रोहित मर्दाने, विजय गोसावी, अमित सर्जे, अमित मर्दाने, निवृत्ती माळी, महेश खोत, सागर चौगुले, महेश आंबी, राजेंद्र वरंडेकर, सुशिल पाटील, शिवानंद मठपती तसेच सायबर सेलचे सुरेश राठोड यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आल्याची माहिती मिळाली.