नवी मुंबईत ४ लाख ६९ हजार २१३ रुपयांचा धान्याचा काळाबाजार

 


महापे एमआयडीसीत फिरत्या पथकाची धाड; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील महापे एमआयडीसी औद्योगिक परिसरात शासन नियंत्रित दरातील शिधाजिन्नसांची अवैध खरेदी-विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच नागरी पुरवठा विभागाच्या फिरत्या पथकाने गुरुवारी (२० नोव्हेंबर) रात्री मोठी कारवाई केली. या कारवाईत रेशनिंगचा गहू व तांदूळ असा एकूण ४ लाख ६९ हजार २१३ रुपयांचा मुद्देमाल तसेच एक टेम्पो जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मे. सिमोज इंटरप्रायझेस या औद्योगिक युनिटमध्ये शासन नियंत्रित दरातील धान्याची मोठ्या प्रमाणावर अवैध साठवणूक केली जात असल्याची पक्की माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयाच्या पथकाने रात्री सुमारे १० वाजता परिसरात धाड टाकली. मिलच्या कंपाऊंडमध्ये रॅम्पवर उभ्या असलेल्या टाटा इंट्रा वाहनातून धान्य उतरवण्याची तयारी सुरू होती. यावेळी पिंटू रामप्रसाद कोरी (चालक) आणि सचिन पनवाल (हमाल) हे दोघे धान्य उतरवत असल्याचे दिसले. चौकशीत त्यांनी वाहनातील गोण्या रेशनिंग गहू व तांदळाच्या असल्याची कबुली दिली.

तपासणीदरम्यान ५० किलो वजनाच्या ४१ गोण्या गहू, ३० किलो वजनाच्या ९ गोण्या गहू, ५० किलो वजनाच्या २१ गोण्या तांदूळ आणि ३० किलो वजनाच्या ५ गोण्या तांदूळ असा मोठा साठा आढळला. हा माल शासनाच्या रेशन दुकानेतून पलटी करून काळाबाजारात विक्रीसाठी आणल्याचे पथकाने स्पष्ट केले. चालक पिंटू कोरीने हा माल मुंबईतील अँटॉप हिल परिसरातून आणल्याचे सांगितले.

तपासात पुढे मे. सिमोज इंटरप्रायझेसचे मालक शिवलाल गेहलोतराजन सिंग, तसेच वाहनमालक आशिष पमिजा यांचीही या अवैध व्यवहारातील नावे समोर आली. सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शिधाजिन्नसांचा काळाबाजार रोखण्यासाठी अशा धाडी सातत्याने सुरू राहतील, अशी माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा विभागाचे निरीक्षक चंद्रकांत डांगे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post