जिल्ह्यात पैशाच्या राजकारणावरून आरोप–प्रत्यारोपांचा युद्ध
मालवण : मालवण नगरीत निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार निलेश राणे यांनी केलेल्या धडाकेबाज ‘स्टिंग ऑपरेशन’मुळे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपाचे स्थानिक पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरात प्रवेश करून राणे यांनी केलेल्या तपासात पैशाने भरलेली पिशवी सापडल्याचा दावा करत त्यांनी थेट भाजपावर आणि विशेषतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
राणे यांनी आरोप केला की, “हे पैसे मतदारांना वाटण्यासाठीच आले असून ते प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनीच आणले आहेत. जिल्ह्यात आधीही काही कोटी रुपये आले व त्यांचे वाटप झाले आहे.” त्यांनी हा संपूर्ण प्रकार फेसबुक आणि सोशल मीडियावर लाईव्ह करून निवडणूक यंत्रणा व पोलीस यंत्रणेशी थेट संपर्क साधला. दरम्यान निवडणुका मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि कणकवली या चार ठिकाणी होत असून २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हे स्टिंग समोर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
केनवडेकर यांच्या घरातून बंडलांनी भरलेली पिशवी जप्त
राणे यांनी घरात प्रवेश करताच बेडरूममध्ये नोटांच्या बंडलांनी भरलेली पिशवी दिसल्याचे सांगितले. निवडणूक अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा ही बॅग आणि एक डायरी ताब्यात घेतल्याचे समजते.
केनवडेकर यांनी “हे पैसे व्यवसायातील आहेत” असे सांगण्याचा प्रयत्न केला असला तरी राणे यांनी “संबंधित यंत्रणा तपास करतील” असे स्पष्ट केले.
राणे यांनी आणखीही काही स्थानिक भाजप नेत्यांच्या घरी पैसे लपवून ठेवल्याचा आरोप केला असून “अशा पद्धतीने पैसे वाटून निवडणुका जिंकल्या तर नगरपरिषद लुटली जाईल” असा सवाल उपस्थित केला.
आरोप खोटे व बिनबुडाचे” – भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत
या आरोपांवर भाजपाने जोरदार प्रतिकार केला आहे. रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले,
“ही विरोधकांची भीती आणि रडीचा डाव आहे. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मालवणची जनता सर्व जाणते; आमचे सर्व उमेदवार विजयी होतील.”
सावंत यांनी पुढे स्पष्ट केले की केनवडेकर हे व्यावसायिक असून संघाचे स्वयंसेवक आणि भाजपाचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांच्या घरातील पैशांचा पक्षाशी संबंध नाही. तसेच राणे यांनी थेट त्यांच्या घरी जाणे अयोग्य असल्याचा त्यांनी दावा केला.
वैभव नाईकांचा प्रत्यारोप
दरम्यान, उबाठा सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनीही राणेंच्या आरोपांना पाठिंबा देत भाजपावर जुने आरोप पुन्हा उपस्थित केले.
“गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केनवडेकर हे प्रचारप्रमुख होते आणि त्यावेळी प्रत्येक मतदाराला ५ ते १० हजार रुपये वाटण्यात आले. आता शिंदे सेना त्याहून अधिक पैसे वाटत आहे,” असा दावा त्यांनी केला.
