वानखेडे क्रिकेट संग्रहालयात शासकीय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

 


खासगी शाळांना ५०% सवलत

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) नवनिर्वाचित समितीची पहिली बैठक शनिवारी अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगर पालिकां व जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना वानखेडे स्टेडियम परिसरातील जागतिक दर्जाच्या क्रिकेट संग्रहालयात मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच खासगी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्कात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय समितीने घेतल्याची माहिती जितेंद्र आव्हाड ( मुंबई क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष) यांनी बैठकीनंतर देण्यात आली.


या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वानखेडे स्टेडियमचा फेरफटका, संग्रहालयातील क्रिकेटचा इतिहास-वारसा, जागतिक पातळीवरील संस्मरणीय क्षण तसेच मुंबईचे भारतीय क्रिकेटमधील योगदान याबाबत प्रत्यक्ष अवलोकन करण्याची संधी मिळणार आहे. मुंबईला क्रिकेटची ‘पंढरी’ म्हणून असलेली ओळख अधिक भक्कम करण्यासोबतच नव्या पिढीत क्रीडाविषयक उत्साह निर्माण करणे आणि स्थानिक क्रीडा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. 


या उपक्रमासाठी आवश्यक असलेले वेळापत्रक, गटानुसार प्रवेशाची प्रक्रिया आणि अंमलबजावणीसंबंधित सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post