प्रशिक्षक अमोल मुजुमदार आणि युवराज संभाजी छत्रपती यांची सदिच्छा भेट



मुंबई : वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी शुक्रवारी मुंबईत युवराज संभाजी छत्रपती यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान चिरंजीव शहाजीराजे छत्रपतीही उपस्थित होते. १९९९ सालापासून असलेली परस्परांची घनिष्ठ मैत्री आणि क्रिकेटविषयक उपक्रमांवरील सततचा संवाद यावेळी दोघांनीही आठवला.


भारतीय महिला संघाने यंदाचा वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला असून या विजयामागील रणनीतीमध्ये अमोल मुजुमदार यांचे नेतृत्व ठळकपणे अधोरेखित झाले. पाचच गोलंदाजांसह खेळण्याचा त्यांचा धाडसी निर्णय सामन्यांमध्ये निर्णायक ठरला. तसेच जेमीमा रॉड्रिक्सला पाचव्या क्रमांकाऐवजी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी बढती देण्याचा घेतलेला निर्णयही संघाच्या कामगिरीला नवी दिशा देणारा ठरला. अमनजीत कौर, क्रांती गौड आणि श्री चरणी यांसारख्या नवख्या खेळाडूंना संधी देत त्यांनी संघाच्या भविष्यासाठी मजबूत पाया रचला.


मुजुमदार यांनी भेटीदरम्यान वर्ल्ड कप विजयानिमित्त प्राप्त झालेले सन्मानचिन्ह (मेडल) युवराज संभाजी छत्रपती यांना दाखविताना विशेष आनंद व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वगुणांचे आणि संघावर केलेल्या परिश्रमांचे युवराज संभाजी छत्रपती यांनी कौतुक करत त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.




Post a Comment

Previous Post Next Post