उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उल्हासनगरातील पाच ज्येष्ठ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश



प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या कार्यपद्धतीला कंटाळून पाच ज्येष्ठ नगरसेवकांचा पक्षाला रामराम

  

उल्हासनगर :  ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या पाच ज्येष्ठ नगरसेवकांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेला उल्हासनगरात बळ मिळाले आहे.


उल्हासनगर महापालिकेतील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक जमनू पुरसवानी, प्रकाश मखिजा, महेश सुखरामानी, किशोर वनवारी आणि मीना सोंडे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.


सलग पाच वेळा निवडून आलेले जमनू पुरसवानी हे भाजपचे १९८४ पासूनचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सलग १७ वर्ष उल्हासनगर महापालिकेत गटनेता असलेले पुरसवानी सिंधी समाजातले २५ वर्षांपासून नगरसेवक आहेत. पुरसवानी यांनी यापूर्वी भाजपचे दोन वेळा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती.


भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना कंटाळून उल्हासनगरातील भाजपचे जुनेजाणते कार्यकर्त्यांनी भाजपची साथ सोडली आहे. वर्ष २०२३ पासून रवींद्र चव्हाण यांच्यामुळे ३० कोटींचा आमदार निधी वापराविना पडून आहे. प्रदेशाध्यक्षांच्या मनमानीमुळे उल्हासनगरात भाजप पक्षात खदखद असल्याचे मत या ज्येष्ठ नगरसेवकांनी व्यक्त केले आहे.  


प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर सुद्धा त्याची पक्षाकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या नगरसेवकांनी अखेर शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या ज्येष्ठ नगरसेवकांना इतर पक्षांचे पर्याय होतो, मात्र हिंदुत्व आणि एनडीएमध्ये राहण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांना विनंती केली आणि धनुष्यबाण हाती घेतला. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराचा ज्या प्रकारे विकास केला तसा विकास उल्हासनगराचा करावा, या विचाराने पाचही ज्येष्ठ नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. निवडणूक लक्षात घेता येत्या काळात शिवसेनेत आणखी पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे.  


नगरसेवकांना शिवसेना- भाजप युती हवी होती

उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकांना शिवसेना भाजप युती व्हावी, अशी इच्छा होती, मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक पातळीवर युतीबाबत घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.बाहेरुन आलेल्या राजकीय व्यक्तींना पक्षात स्थान आणि मान मिळाल्याने जुन्याजाणत्या नगरसेवकांना टोकाची भूमिका घ्यावी लागली.

Post a Comment

Previous Post Next Post