ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूती विभागात प्रसूतीसाठी वाढत्या महिला रुग्णसंख्येचा विचार करून खाटांची संख्या वाढवून ९० करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. तसेच, मुंब्रा येथील प्रसूतिगृहाकडून वाढत्या रुग्ण ओघाचा विचार करून स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालयातील एम. एम. व्हॅली प्रसूतिगृहास छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या विस्तारित केंद्राचा दर्जा देऊन तेथे अद्ययावत प्रसूतीशास्त्र विभाग पूर्ण स्वरूपात सुरू करण्याचे निर्देश दिले.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागात दररोज सरासरी २०० बाह्य रुग्ण येतात, तर प्रसूती पश्चात कक्षात ७० खाटा उपलब्ध आहेत. या विभागात दररोज सरासरी १८ प्रसूती होतात; तर ऑक्टोबर २०२५ मध्ये दररोज २२ प्रसूतींची नोंद झाली.
रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, बहुतांश वेळा प्रसूती पश्चात कक्षातील ९८ खाटा पूर्णपणे भरलेल्या असतात. ठाणे महापालिका क्षेत्रासह ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण व आजूबाजूच्या भागांमधून महिला प्रसूतीसाठी येथे दाखल होत असल्याने रुग्णभार मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट, आणि रुग्णालय अधिक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर उपस्थित होते.
महापालिका प्रशासनाने प्रसूती विभागाच्या सुधारणा व विस्ताराला गती देऊन नागरिकांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
